पारनेर – तालुक्यातील सुपा येथील श्रीराम ज्वेलर्स या सराफी दुकानात चार महिलांनी भर दिवसा दागिन्यांची चोरी केली असून, नागरिकांनी दोघींना पकडले असून, दोघी चारचाकी वाहनातून पळून जाण्यात यशस्वी झाल्या आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, भाजपचे पदाधिकारी व सुप्याचे उपसरपंच सागर मैड व अमोल मैड यांचे सुपा बाजारतळ परिसरात श्रीराम ज्वेलर्स नावाचे सोन्या-चांदीचे दुकान आहे. मंगळवारी दुपारी एक ते दीडच्या दरम्यान अमोल मैड जेवणासाठी वरील मजल्यावर गेले असता दुकानात त्यांची आई दुकान सांभाळत होती. दुकानात महिला असल्याचे पाहून चार महिला दुकानात दागिने खरेदी करण्यासाठी गेल्या. त्याच वेळी त्या महिलांनी चारचाकी कार बाजारतळावर सुपा-पारनेर रोडवर सज्ज ठेवली होती. दागिने खरेदी करण्याच्या निमित्ताने या महिलांनी अनेक दागिने पाहिले.
जास्त बोलून व प्रत्येकीने वेगवेगळ्या वस्तू विचारून गोंधळ निर्माण केला. या गडबडीत या महिलांनी काही दागिने चोरले व काहीतरी वाकडे तिकडे कारण सांगत दुकानातून पळ काढाला. चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर सागर मैड यांच्या आईने आरडाओरडा केला असता दोघी चोर महिला पळत जाऊन चारचाकी कारमध्ये बसून पळून जाण्यात यशस्वी झाल्या. या वेळी कारचालकाने गडबडीत दोघा जणांना धडक दिली, तर एक चोर महिलेला जागेवरच पकडले, तर एक चोर महिला वृद्ध असल्याने कारमध्ये पटकन जाऊन बसता न आल्याने तेथील नागरिकांनी व महिलांनी पकडून दुकानात बसवले.
चोरीची माहिती कळल्यावर सुपा पोलिस स्टेशनचे पोहेकॉ ओहळ, पोमहेकॉ भीमाबाई रेपाळे, यशवंत ठोबरे हे घटनास्थळी आले. त्यांनी दोन्ही चोर महिलांना ताब्यात घेतले.
दोन चोर महिला व त्यांना घेऊन जाणाऱ्या कारचालक व पकडलेल्या महिला चोर यांच्याविरुद्ध सुपा पोलिस गुन्हा नोंदवण्याचे काम करत आहेत.