अकोले – राज्य सरकारने शेतकऱ्याचा उत्पादन खर्च लक्षात घेऊन गायीच्या दुधाला किमान खरेदी दर 34 रुपये निश्चित केले. हा निर्णय सहकारी संस्थांसह खासगी दूध प्रकल्पांना ही बंधनकारक असल्याने येथील अमृतसागर सहकारी दूध संघ दि. 21 जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करणार असून दुध उत्पादकांच्या दुधाला 34 रुपयाप्रमाणे संघ दर देणार असल्याचे संघाचे अध्यक्ष माजी आमदार वैभव पिचड यांनी जाहीर केले .
अमृतसागर दूध संघाची आज संचालक मंडळाची विशेष बैठक झाली. यामध्ये या शासन निर्णयाचे वाचन करण्यात आले. राज्य सरकारने 27 जून रोजी याबाबत शासन निर्णय काढला असून यामध्ये राज्यातील दूध दर प्रश्नासंदर्भात विविध दूध उत्पादक शेतकरी संघटना व पशुखाद्य उत्पादक कंपन्याचे प्रतिनिधी सोबत पशसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या मध्ये हा निर्णय घेण्यात आला होता. दूध संकलन हे प्रामुख्याने खासगी व सहकारी दूध संस्थांकडून करण्यात येते. यातील काही लोक शेतकऱ्याचे दूध कमी भावाने खरेदी करतात. यामुळे दुध उत्पादक शेतकरी तोट्यात जातो. राज्य सरकारने प्रती लिटर विना कपात 34 रुपये गायीचे दुध खरेदी दर असणार असून याची अंमलबजावनी दूध संघ दि. 21 जुलैपासून करणार असल्याचे पिचड यांनी जाहीर केले.
यावेळी बैठकीस उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, संचालक गोरक्ष मालूजकर, शरद चौधरी, आनंदराव वाकचौरे, आपासाहेब आवारी, रामदास आंबरे, जगन देशमुख, अरुण गायकर, बबन चौधरी, गंगाधर नाईकवाडी, सुभाष डोंगरे, बाबुराव बेनके, अश्विनी धुमाळ, सुलोचना ओटी, दयानंद वैद्य, बाळासाहेब मुंडे, कार्यकारी संचालक दादाभाऊ सावंत उपस्थित होते.