श्रीगोंदा –प्रेम संबंधाबाबत विचारणा केल्याचा राग आल्याने पतीने पत्नी रुपाली ज्ञानदेव आमटे (वय 24) हिची हत्या केल्याची घटना दि.10 नोव्हेंबर रोजी श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक या गावात घडली. याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात मयत महिलेचा भाऊ रोहित मडके (रा.फक्राबाद ता. जामखेड) याच्या फिर्यादीवरून ज्ञानदेव पोपट आमटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीच्या अनैतिक संबंधाबाबत त्याच्या पत्नीला माहीत होताच तिने याबाबत पतीला विचारणा केली. याचा राग येऊन आरोपीने पूर्व नियोजित कट रचित घराच्या शेजारी मोठा खड्डा खोदून दि.10 नोव्हेंबर रोजी सकाळी दोन्ही मुलांना बेलवंडी येथील बहिणीकडे नेऊन सोडत माघारी येऊन पत्नीची क्रूर हत्या करत नात्याला काळीमा फासणारे कृत्य करत पुरावा नाहीसा करण्याच्या उद्देशाने आरोपीने पत्नीचा मृतदेह कापडामध्ये बांधून घराच्या बाजूला अगोदरच खोदलेल्या खड्डयात पुरून टाकला.
आपण केलेले कृत्य कोणाच्या लक्षात येऊ नये यासाठी आरोपीने त्याच्या मयत पत्नीला श्रीगोंदा येथे पार्लरसाठी नेऊन सोडले आणि त्यानंतर ती घरी माघारी आली नसल्याचे तिच्या माहेरच्यांना सांगत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात हरविल्याची खोटी तक्रार दिली. तसेच मयत महिलेच्या भावाला सोबत घेऊन परिसरात शोध घेतला. महिला मिळून न आल्याने मयत महिलेच्या भावाला तिच्या नवऱ्यावर संशय आल्याने त्याने परिसरातील सीसीटिव्ही चेक केले.
असता आरोपी आणि त्याची पत्नी हे दोघेही श्रीगोंदा येथे गेले नसल्याचे लक्षात येताच त्याने आरोपीच्या घराच्या परिसरात शोध घेतला असता तेथे नुकत्याच बुजविलेला खड्डा उकराला असता घाण वास आल्याने पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत खड्डा उकरला असता कपड्यात बांधलेला मृतदेह आढळून आल्याने मयत महिला ही हरवली नसून तिचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. गुन्हा दाखल होत असल्याचे समजताच आरोपीने मोबाईल बंद करून पलायन केले असून आरोपीच्या शोधार्थ पथके पाठविण्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी दिली.