नवी मुंबई – एका पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलताना भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. त्यांनी म्हटले की, स्वताच्या पक्षातच महिला आमदारांना डावललं जात आहे. मी पहिल्यावेळी निवडून आले त्यावेळी मोदींची लाट होती, असं म्हटलं गेलं.
त्यानंतर मी दुसऱ्यांदा निवडून आले, त्यावेळी तर मोदींची लाट नव्हती ना. मी माझ्या कामावर निवडून आले. ते माझं कर्तृत्व होतं. पण महिलांच काम झाकून टाकायचं, त्याच्या बातम्यासुद्धा येऊ द्यायच्या नाहीत असे प्रकार सध्या सुरू आहेत असे नमूद करीत त्यांनी आपल्या पक्षाच्या कार्यपद्धतीचेच वाभाडे काढले.
आपण कोणालाहीं घाबरत नाही, मी स्पष्टपणे बोलतच राहणार आहे, मला तिकीट द्या किंवा देऊ नका पण मी स्वतंत्रपणे लढणारच आहे असेही इशारा त्यांनी देऊन ठेवला आहे. राजकारणात महिलांना यश मिळू लागल्यानंतर पक्षातल्याच नेत्यांकडून त्यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न केला जातो असेही त्या म्हणाल्या.
मंदा म्हात्रे यांनी ज्या कार्यक्रमात हे उद्गार काढले त्या कार्यक्रमाला कॉंग्रेसच्या नेत्या व महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर इत्यादी उपस्थित होते.