मायणी – मल्हारपेठ ते पंढरपूर रस्त्यालगत असलेल्या मायणी येथील संत सदगुरू सरुताई मठाजवळ कलेढोणकडून शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारच्या चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने तेथे असणाऱ्या रसवंतीगृहाला कारने जोरदार टक्कर दिली. रसवंतीगृह चालविणाऱ्या निर्मला धोंडीराम लिपारे (वय 42, रा. मायणी) या महिलेलाही कारने जोरदार टक्कर दिली. यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना पुढील उपचारासाठी कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये पाठवले असता हॉस्पिटलला पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत घटनास्थळ व पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कलेढोण (ता. खटाव) येथील साळुंखे मळ्यातील तुषार साळुंखे (चालक), राजाराम साळुंखे, नंदाताई साळुंखे, सुप्रिया साळुंखे व दोन लहान मुली स्विफ्ट डिझायर (एमएच 12 एसवाय 8404) या कारने घरात कार्यक्रम असल्याने कपडे खरेदी करण्यासाठी मायणीत येत होते. कार मायणी अभयारण्याकडून संत सरुताई मठाकडे येताना चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि चालकाच्या विरुद्ध बाजूला मठाजवळ असलेल्या रसवंतीगृहाला व निर्मला धोंडीराम लिपारे यांना जोरदार धडक दिली. या महिलेला उडवल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.
गाडी भरधाव वेगात असल्यामुळे ती पलटी झाली. त्यावेळी मायणी व विखळे ग्रामस्थांनी तातडीची मदत करून जखमी महिलेला पुढील उपचारासाठी कराड येथे पाठवले. मात्र, हॉस्पिटलला पोहोचण्यापूर्वीच या महिलेचा मृत्यू झाला. गाडीतील सर्वांना बाहेर काढले असता सर्व सुखरूप होते. घटनास्थळी पोलीस नाना कारंडे, पोलीस पाटील प्रशांत कोळी यांनी भेट दिली. बीट अंमलदार भूषण माने तपास करीत आहेत.