काबूल – अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय पातळीवरील महिलांच्या ज्युनिअर व्हॉलीबॉल संघातील खेळाडूचा तालिबानी दहशतवाद्यांनी शिरच्छेद केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या व्हॉलीबॉल संघाच्या प्रशिक्षक सुरय्या अफझाली (बदललेले नाव) यांनी एका मुलाखतील ही माहिती दिली.
मोहजबिन हाकिमी (बदललेले नाव) या खेळाडूची तालिबान्यांनी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच हत्या केली आहे. मात्र, या घटनेबद्दल कोणाजवळही काहीही बोलायचे नाही, अशी धमकी तालिबान्यांनी मोहजबिनच्या कुटुंबीयांना दिली होती. त्यामुळे हा प्रकार उघडकीस येऊ शकला नाही, असे अफझाली यांनी सांगितले.
मोहजबिन ही क्लबची आघाडीची खेळाडू होती. मात्र काही दिवसांपूर्वी तिच्या धडापासून वेगळे केलेल्या शिराचे आणि रक्ताने माखलेल्या मृतदेहाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तालिबानने ऑगस्ट महिन्यात अफगाणिस्तानच्या सत्तेची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी या ज्युनिअर व्हॉलीबॉल महिला संघातील केवळ दोन खेळाडूंना देशाबाहेर जाणे शक्य झाले होते. मात्र, मोहजबिन जाऊ न शकल्यामुळे दुर्दैवी ठरली, असेही अफझाली यांनी सांगितले.
तालिबानने सत्ता ताब्यात घेतानाच खेळाडू महिलांचा शोध सुरू केला होता. महिलांच्या व्हॉलीबॉल संघातील ज्या खेळाडूंनी पूर्वी विदेशातील स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे आणि ज्यांनी प्रसिद्धीच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेतला होता, अशा अन्य खेळाडूंचा शोधही तालिबानकडून घेतला जातो आहे, असेही अफझाली म्हणाल्या.