आयसीयू-2 मध्ये नॉन कोविड रुग्णांसाठी 15 बेड राखीव
पिंपरी – गेल्या आठवड्यात वायसीएम रुग्णालय कोविड रूग्णांसाठी समर्पित करण्यात आले. मात्र येथील आयसीयू-2 हा नॉन कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवला आहे. या आयसीयू मधील आठ व्हेंटीलेटर वापराविना पडून आहेत.
करोनाची दुसरी लाट सध्या जोरदार सुरू असून पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत बाधित येण्याचे प्रमाण खूपच जादा आहे. तर अनेक कोविड रुग्णांची प्रकृती अचानक गंभीर होत असून त्यापैकी अनेकांना ऑक्सिजनची आवश्यकता लागते. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता महापालिकेने जम्बो कोविड रुग्णालयाही सुरू केले आहे. मात्र आजही शहरात असे अनेक रुग्ण आहेत की त्यांना व्हेंटीलेटरची आवश्यकता आहे. खासगी रुग्णालयातील व्हेंटीलेटर असलेले बेड फुल्ल झाले आहेत. तर सर्वसामान्य नागरिकांना खासगी रुग्णालयाचे दर परवडणारे नाहीत. अशावेळी रुग्णांचे नातेवाईक महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाकडे धाव घेतात.
अपघात, मारहाण किंवा इतर अचानक उद्भवणारे आजाराचे रुग्ण महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील तातडीक विभागात येतात. हे रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे नॉन कोविड असलेले रुग्ण येथे उपचारासाठी येणे जवळपास बंदच झाले आहे. मात्र वायसीएम रुग्णालयातील आयसीयू-2 हे नॉन कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. 15 बेडच्या या आयसीयू युनिटमध्ये सध्या पाच रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी एकाही रुग्णाला व्हेंटीलेटरची आवश्यकता नाही. त्यांना महापालिकेच्या इतर रुग्णालयामध्ये स्थलांतरित केले जाऊ शकते. यामुळे या आयसीयूमध्ये असलेले आठ व्हेंटीलेटर वापराविना पडून आहेत.
शहरातील करोनाग्रस्त रुग्णांचे व्हेंटीलेटर अभावी जीव जात असताना येथील आठ व्हेंटीलेटर पडून असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आयसीयू-2 हा देखील कोविड रुग्णांवरील उपचारासाठी करण्याचा निर्णय कोण घेणार, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. याबाबत वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन घेतला नाही.