पिंपरी, (प्रतिनिधी) – वायसीएममध्ये रुग्ण तपासणीदरम्यान रुग्णाचे नातेवाईक व निवासी वैद्यकीय अधिकार्यांमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनेनंतर वायसीएममधील स्वतंत्र पोलीस चौकीचा विषय पुन्हा एरणीवर आला आहे. या घटनेनंतर आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्षमण गोफणे यांनी तातडीने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांची भेट घेत, घटनेविषयी माहिती दिली.
या भेटीदरम्यान वायसीएमच्या सुरक्षा यंत्रणेत बदल करण्याचे संकेत सिंह यांनी दिले आहेत. तर वायसीएममधील स्वतंत्र पोलीस चौकी सुरू करण्याबाबत ते पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याशी चर्चा करणार आहेत.
रुग्ण महिलेवरील उपचारादरम्यान झालेल्या बाचाबाचीतून रुग्णाचे नातेवाईक व निवासी वैद्यकीय अधिकार्यांमध्ये सोमवारी हाणामारीची घटना घडली. याबाबत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र ही घटना घडताना याठिकाणी नियुक्त केलेल्या सुरक्षा यंत्रणेने प्रभावीपणे भूमिका न बजावल्याने ही गटना घडल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यामुळे कर्तव्य बजावताना वैद्यकीय अधिकार्यांना संरक्षण पुरविण्यास असमर्थ ठरलेली कुचकामी सुरक्षा यंत्रणा बदलण्याचे संकेत आयक्त सिंह यांनी दिले आहेत.
महापालिकेचे वासयीएम रुग्णालय अल्पदरात दर्जेदार उपचारांकरिता प्रसिद्ध असल्याने जिल्हाभरातील रुग्णांचा याठिकाणी कायम ओघ असतो. त्यामुळे या ुग्णालयात कायम रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची ये-जा असते. अत्यवस्थ रुग्णावर तातडीने उपचार व्हावेत, अशी नातेवाईकांची अपेक्षा चुकीची नाही. मात्र, अवास्तव मागणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी व नातेवाईकांमध्ये खटके उडण्याचे प्रकार घडत आहेत.
दरम्यान, काही संवेदनशील घटनांच्या बाबतीत पोलीस प्रशासनाकडून होत असलेल्या विलंबाचे कारणाचे खापर वैद्यकीय अधिकार्यांवर फोडले जाते. परिणामी अनेकदा या अधिकार्यांना रुग्णाच्या नातेवाइरकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. या घटना रोखण्याची निवासी वैद्यकीय अधिकारी संघटनेची मागणी आहे.
काम बंद आंदोलनाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही
सोमवारी घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ निवासी वैद्यकीय अधिकार्यांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनात 30 वैद्यकीय अधिकारी सहभागी झाले होते. मात्र, या आंदोलनाचा वायसीएमच्या रुग्णसेवेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचा दावा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्षमण गोफणे यांनी केला.