वेलिंग्टन -न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार केन विल्यमसनला मानाचे सर रिचर्ड हॅडली पदक सलग चौथ्यावेळी जाहीर झाले आहे. न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने गुरुवारी वार्षिक क्रिकेट पुरस्कारांची घोषणा केली. गेल्या सहा वर्षांतील विल्यमसनचे हे चौथे पदक आहे.
तो यंदाचा सर्वोत्कृष्ट कसोटी क्रिकेटपटूही ठरला. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या विल्यमसनने देशांतर्गत स्पर्धेतही चमकदार कामगिरी केली आहे. त्याने रेडपाथ करंडकासह अन्य दोन पुरस्कारही मिळवले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चार डावांत विल्यमसनने 639 धावा केल्या.
यात त्याच्या 251 धावांच्या खेळीचाही समावेश आहे. त्यानंतर विल्यमसनने बे ओव्हल येथील बॉक्सिंग डे कसोटीत शतक ठोकले आणि ख्राईस्टचर्च येथे पाकिस्तानविरुद्ध द्विशतक फटकावत न्यूझीलंडला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवून दिला.
डेव्हन कॉनवेला त्याच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सत्रात एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडले गेले. करोनामुळे हे पुरस्कार सलग दुसऱ्या वर्षी ऑनलाइन घेण्यात आले.