दुर्घटनांबाबत औद्योगिक सुरक्षा विभागाने घेतला निर्णय
कुरकुंभ : कुरकुंभ (ता.दौंड) येथील औद्योगिक वसाहतीमधील मोडेप्रो इंडिया प्रा. लि. कंपनीतील रविवार (दि.25) थाईनायल क्लोराईड केमिकल बॅरलमधून अचानक गळती झाली होती. याबाबत सोमवार (दि.26) औद्योगिक व आरोग्य सुरक्षा विभागाचे उपसंचालक अखिल घोगरे यांनी कंपनीच्या घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी सवांद साधला.
कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील झालेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर औद्योगिक सुरक्षा विभागाने मागील दहा ते बारा दिवसांत एमआयडीसीमधील दोन कंपन्या बंद केल्या आहेत. कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील कोणत्याही कंपनीमध्ये लहानमोठे अपघात झाल्यास कंपनीची कोणत्याही प्रकारे गय केली जाणार नाही. या अगोदर मोठया कंपन्यात घडलेल्या घटनेबाबत कारवाई करून गुन्हे दाखल केले आहेत. परंतु या कारवाईची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचू शकली नव्हती. यापुढे कंपन्यांमध्ये अपघात झाले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे अखिल घोगरे (उपसंचालक औद्योगिक व आरोग्य सुरक्षा विभाग पुणे) यांनी सांगितले.
कंपन्यांवर कारवाई करणार का?
कुरकुंभ औद्योगिक वसाहतींमधील कंपन्यांमध्ये सततच्या होणाऱ्या लहान-मोठ्या अपघाताबाबत औद्योगिक सुरक्षा विभागाने कारवाईचा धडाकाच चालू केला आहे. त्यामुळे येथील कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. मात्र उग्र वास आला की कुरकुंभ आले. समजा, अशी स्थिती येथील कंपन्याच्या प्रदूषणामुळे झाली आहे. येथील नागरिकांना कंपन्याच्या सततच्या प्रदूषणाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. औद्योगिक सुरक्षा विभागाने जरी कंपन्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली असली तरी प्रदूषण नियंत्रण मंडळ या कंपन्यांबाबत काय निर्णय घेईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कंपन्या मध्ये लहान-मोठे अपघात झाल्यास कंपन्यांची गय केली जाणार नाही.
-अखिल घोगरे, औद्योगिक व आरोग्य सुरक्षा विभागाचे उपसंचालक