कर्जत/जामखेड :आमदार रोहित पवार यांच्या सहकार्यातून व जिल्हा क्रीडा कार्यालय, अहमदनगर यांच्यामार्फत कर्जत व जामखेडमधील 19 शाळांना प्रत्येकी तीन लाखांचे खेळाचे साहित्य देण्यात आले आहेत. ज्यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचा समावेश आहे. संबंधित खेळाचे साहित्य हे जिल्हा क्रीडा योजनेअंतर्गत आमदार रोहित पवार यांच्या हस्ते देण्यात आले.
एकूण 40 खेळांसाठी असलेले साहित्य या माध्यमातून शाळांना उपलब्ध झाले आहेत. कर्जत व जामखेड तालुक्यातील विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात मागे राहू नये, असा आमदार रोहित पवार यांचा कायम प्रयत्न असतो. त्यातच शाळांना विविध अशा 40 खेळांचे साहित्य वाटप करण्यात आल्याने मतदारसंघातील विद्यार्थी नक्कीच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करतील व आपल्या तालुक्याचे नाव मोठे करतील, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व विद्यार्थी हितासाठी शासनाकडून लागणारी सर्वतोपरी मदत व शासकीय योजनांचा लाभ मतदारसंघात मिळवून देण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. तसेच विद्यार्थ्यांनाही खेळाचे साहित्य शाळेत उपलब्ध झाल्याने त्यांची खेळाबद्दलची गोडी वाढेल व त्यांना विविध प्रकारच्या खेळात रुची निर्माण होईल.