पुणे – भाजप आमदार आणि पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टीळक यांचे दीर्घ आजाराने गुरुवारी (दि. 22) निधन झाले. पुण्यातील गॅलेक्सी हाॅस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या सकाळी (शुक्रवार दि. 23) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्या कर्करोग आजाराशी झुंज देत होत्या, अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, टिळक यांच्या निधनानंतर नागपूर हिवाळी अधिवेशनात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विधानभवनाच्या पायऱ्यांवर मुक्ता टिळक यांना विरोधकांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली.
आमदार टिळक यांच्या निधनाबद्दल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे. 1992 पासून नगरसेवक असलेल्या मुक्ताताईंना पुण्याच्या प्रश्नांची चांगली जाण होती. पुण्याच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतीक जीवनाशी एकरुप झालेलं त्यांचं व्यक्तिमत्वं होतं. लोकमान्य टिळकांच्या घराण्याचा वारसा त्यांनी यशस्वीपणे जपला. आमदार म्हणून 2019 मध्ये त्या पहिल्यांदा निवडून आल्या होत्या. मुक्ताताईंच्या निधनानं एक चांगला लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. पुण्याच्या विकासातलं त्यांचं योगदान कायम लक्षात राहील, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुक्ताताई टिळक यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.