दहिवडी – पळशी, ता. माण येथील चिराग डोईफोडे हे जिद्द आणि मेहनतीने पायलट बनल्यावर, त्यांच्या वडिलांनी हेलिकॉप्टरमधून ग्रामदैवत हनुमान मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली. चिराग डोईफोडे यांच्या रूपाने सातारा जिल्ह्याला दुसरा कर्मशिअल पायलट मिळाला आहे. चित्रपट निर्माते, देवमाणूस या मालिकेतील “लाला”फेम डॉ. शशिकांत डोईफोडे यांचा मुलगा चिराग डोईफोडे यांच्यामुळे सातारा जिल्ह्याचे नाव अन्य क्षेत्रांबरोबर आता हवाई क्षेत्रातही चमकले आहे. मुलगा पायलट झाल्यास हनुमान मंदिरावर पुष्पवृष्टी करण्याचा नवस बोललो होतो, असे शशिकांत डोईफोडे यांनी सांगितले. हेलिकॉप्टरमधून ग्रामदैवत हनुमान मंदिरावर पुष्पवृष्टी करत, त्यांनी आपला आनंद साजरा केला.
चिरागचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण पळशीतील जिल्हा परिषद शाळेत झाले. पाचवी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी तो बारामती येथे गेला. लहानपणासूनच त्याला पायलट व्हायचे होते. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने डीजीसीए अंतर्गत विविध परीक्षा दिल्या. दीड ते दोन वर्षांमध्येच तो परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाला. त्याला कमर्शिअल पायलटचा परवाना नुकताच मिळाला आहे. सातवीत असताना मुलाने पाहिलेले स्वप्न साकारल्याचा आनंद त्याच्या आई-वडिलांना झाला असून, पळशी गावाच्या शिरपेचात अजून एक नवीन तुरा रोवला गेला आहे. माण ही रत्नांची खाण असल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.