नवी दिल्ली – कर्णधार रोहित शर्माची अर्धशतकी खेळी व तिलक वर्मा, इशान किशन, कॅमेरुन ग्रीन आणि टीम डेव्डी यांनी दिलेल्या उपयुक्त साथीच्या जोरावर मुंबईने यंदाच्या आयपीएल स्पर्धेत मंगळवारी आपला पहिला वहिला विजय साकार केला. मुंबईने अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या लढतीत दिल्लीचा 6 गडी राखून पराभव केला. या स्पर्धेत दिल्लीचा हा सलग चौथा पराभव ठरला. मुंबईसाठी हा विजय दिलासादायक ठरला.
दिल्लीने विजयासाठी दिलेल्या 173 धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या डावाची सुरुवात धडाक्यात झाली. कर्णधार रोहित शर्माने इशान किशनसह संघाला 71 धावांची भक्कम सलामी दिली. रोहितच्या चुकीच्या कॉलवर इशान धावबाद झाला. त्याने 31 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 26 चेंडूत 6 चौकार फटकावले.
रोहित आक्रमक खेळत होता व त्याच्या जोडीला तिलक वर्मा फलंदाजीला आला.
दरम्यान रोहितने अर्धशतक पूर्ण केले. तसेच तिलकने रोहितला साथ देत संघाचे शतक फलकावर लावले. मात्र, तो अर्धशतक पूर्ण करु शकला नाही. त्याने 41 धावांची खेळी करताना 29 चेंडूत 1 चौकार व 4 षटकार फटकावले. त्याच्या जागी आलेल्या सूर्यकुमार यादवने साफ निराशा केली. तिलक वर्माला बाद करणाऱ्या मुकेश कुमारनेच सूर्यकुमारलाही बाद केले.
रोहितचा संयम सुटला व मुस्तफिजुर रेहमानच्या गोलंदाजीवर तो 65 धावांवर बाद झाला. या खेळीत त्याने 45 चेंडूंचा सामना करताना 6 चौकार व 4 षटकार फटकावले. रोहित परतला तेव्हा मुंबईची स्थिती 4 बाद 143 अशी बनली होती. यावेळी मुंबईला विजयासाठी दोन षटकांत 20 धावांची गरज होती व खेळपट्टीवर टीम डेव्हीड आणि कॅमेरुन ग्रीन खेळत होते. या दोघांनी एकेक षटकार खेचला व विजय समिप आणला.
अखेरच्या षटकात मुंबईला 5 धावांची गरज होती. अखेरच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर टीम डेव्हीडचा सोपा झेल मुकेश कुमारने सोडला. अखेरच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना डेव्हीड व ग्रीन यांनी दोन धावा धावून काढल्या व मुंबईचा विजय साकार केला. यंदाच्या मोसमातील मुंबईचा हा पहिलाच विजय ठरला तर दिल्लीचा हा सलग चौथा पराभव ठरला. ग्रीनने 8 चेंडूत 1 चौकार व 1 षटकारासह नाबाद 8 तर डेव्हीडने 11 चेंडूत 1 चाकार फटकावताना नाबाद 13 धावा केल्या या जोडीने पाचव्या गड्यासाठी नाबाद 30 धावांची यशस्वी भागीदारी केली. तत्पूर्वी, कर्णधार डेव्हीड वॉर्नर व अक्सर पटेल यांची आक्रमक खेळी व मनिष पांडेच्या उपयुक्त धावांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सला मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 173 धावांचे आव्हान ठेवता आले.
दिल्लीच्या डावाची सुरुवात करताना कर्णधार वॉर्नरने पृथ्वी शॉसह आश्वासक फलंदाजी केली. शॉ 10 चेंडूत 3 चौकारांसह 15 धावा करून बाद झाला. त्यानंतर पांडेने वॉर्नरसह अर्धशतक फलकावर लावले. मात्र, वेगाने धावा करण्याच्या प्रयत्नात तो 18 चेंडूत 5 चौकारांसह 26 धावा करून तंबूत परतला. यश धुलही अपयशी ठरला. रॉमन पॉवेल आणि ललित यादव यांनीही निराशा केली. दरम्यान वॉर्नरने आपले अर्धशतक पूर्ण केले. या जोडीने संघाचे दीडशतकही फलकावर लावले. या जोडीने सहाव्या गड्यासाठी 67 धावांची भागीदारी केली. पटेलनेही अर्धशतक थाटात साकार केले. मात्र, त्यानंतर लगेचच तो बाद झाला. त्याने 54 धावांच्या खेळीत 25 चेंडूंचा सामना करताना 4 चौकार व 5 षटकारांची आतषबाजी केली. पटेलला जेसन बेहेरेनड्रॉफने बाद केले. त्याने तिसऱ्या चेंडूवर वॉर्नरलाही परतवले. वॉर्नरचाही संयम सुटला व अनावश्यक फटका मारून तो 51 धावांवर बाद झाला.
या खेळीत त्याने 47 चेंडूत 6 चौकार फटकावले. यावेळी फलंदाजीला आलेला कुलदीप यादव अनावश्यक धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. त्यानंतर बेहेरेनड्रॉफने अभिषेक पोरेलचाही बळी घेतला. अखेरचे षटक सुरु झाले तेव्हा दिल्लीची अनरीच नोर्जे व मुस्तफिजुर रेहमान ही अखेरची जोडी खेळपट्टीवर होती व त्यांची स्थिती 9 बाद 166 अशी बनली होती. अखेरचे षटक रेले मेरेडीथने टाकले व चौथ्या चेंडूवर नोर्जेला बाद करत दिल्लीचा डाव 172 धावांवर संपुष्टात आणला. मुंबईकडून पियुष चावला व जेसन बेहेरेनड्रॉफ यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. रेले मेरेडीथने 2 बळी घेतले तर ह्रितीक शोकीनने 1 बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक
दिल्ली कॅपिटल्स – 19.4 षटकांत सर्वबाद 172 धावा. (पृथ्वी शॉ 15, मनिष पांडे 26, अक्सर पटेल 54, पियुष चावला 3-22, जेसन बेहेरेनड्रॉफ 3-23, रेले मेरेडीथ 2-34, ह्रितिक शोकीन 1-43). मुंबई इंडियन्स – 20 षटकांत 4 बाद 173 धावा. (इशान किशऩ 31, तिलक वर्मा 41, रोहित शर्मा 65, कॅमेरुन ग्रीन नाबाद 17, टीम डेव्हीड नाबाद 13, मुकेश कुमार 2-30, मुस्तफिजूर रेहमान 1-38).