मुंबई – विप्रो कंपनीने चौथ्या तिमाहीचा ताळेबंद जाहीर केला आहे. या ताळेबंदात कंपनीचा नफा केवळ चार टक्क्यांनी वाढून 2,092 कोटी रुपये झाला आहे.
त्यामुळे बऱ्याच गुंतवणूकदारांनी शेअरची विक्री केल्यामुळे विप्रोच्या शेअरचा भाव तीन टक्क्यांनी कमी होऊन 495 रुपये प्रति शेअर या पातळीवर गेला होता. यामुळे कंपनीचे बाजार मुल्य 7,641 कोटी रुपयांनी कमी होऊन 2.71 लाख कोटी रुपये झाले आहे.
सरलेल्या पूर्ण वर्षात कंपनीचा नफा 12 टक्क्यांनी वाढून 12,232 कोटी रुपये इतका झाला आहे. गेल्या वर्षी या कंपनीचा नफा 10,866 कोटी रुपये होता. माहीती तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यामुळे आगामी काळात कंपनीच्या नफा आणि उलाढालीत वाढ होण्याची शक्यता असल्याचे कंपनीने म्हटले आहे.