नवी दिल्ली – रिझर्व्ह बॅंकेने आतापर्यंत तरी आपल्या मुख्य व्याजदरात वाढ टाळली असली तरी महागाई रोखण्यासाठी आगामी काळात व्याजदरात वाढ होणार आहे. हे लक्षात घेऊन बऱ्याच बॅंकांनी आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. आता घरासाठी कर्ज देणाऱ्या एचडीएफसीने कर्जावरील व्याजदरात 0.05 टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे घरासाठी कर्ज घेतलेल्या ग्राहकांच्या हप्त्याच्या रकमेमध्ये त्या प्रमाणात वाढ होणार आहे.
या अगोदरच भारतीय स्टेट बॅंक आणि बॅंक ऑफ बडोदा या बॅंकांनी आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. हे पाहून आता एचडीएफसीनाही आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिसून येते. एचडीएफसीने यासंदर्भात काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, एचडीएफसीने रिटेल प्राईम लेंडिंग रेटमध्ये 0.05 टक्क्यांची वाढ केली आहे. या आधारावर घरासाठीच्या कर्जाचा व्याजदर प्रामुख्याने ठरविला जातो. या निर्णयाची अंमलबजावणी एक मेपासून होणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
ही दरवाढ फक्त कर्ज घेतलेल्या जुन्या ग्राहकांना लागू होणार आहे. नवीन कर्ज घेणाऱ्यांना ही व्याजदर वाढ लागू होणार नसल्याचे या कंपनीने म्हटले आहेत. सध्या एचडीएफसीचा घरासाठीच्या कर्जावरील व्याजदर 6.70 टक्के ते 7.15 टक्क्यादरम्यान आहे.
गेल्या महिन्यात स्टेट बॅंकेने आपल्या कर्ज घेतलेल्या जुन्या ग्राहकासाठी कर्जावरील व्याजदरात वाढ जाहीर केली होती. करोनाच्या काळात भारतातील रिझर्व बॅंकेसह इतर देशातील रिझर्व बॅंकांनी मुबलक सवलती देऊन भांडवल सुलभता निर्माण केली होती. त्यामुळे वाढलेली महागाई कमी करण्यासाठी अमेरिकेच्या रिझर्व बॅंकेने मोठ्या प्रमाणात व्याजदरात वाढ करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
त्यातच रशिया- युक्रेन युद्ध सुरू झाल्यामुळे इंधनाचे दर आणि इतर वस्तूंचे दर वाढले असल्यामुळे भारताला आयात महागात पडत आहे. अशा परिस्थितीमध्ये महागाईचा दर वाढणार आहे. यासाठी व्याजदरात वाढ करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. रिझर्व बॅंकेने महागाई चार टक्क्यांच्या आत रोखण्याचा संकल्प केला असला तरी या मागायचा दर सहा टक्क्यांच्या पुढे गेला आहे.