नवी दिल्ली – न्यूझिलंडचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री विन्स्टन पीटर्स हे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या निमंत्रणावरून उद्यापासून ३ दिवसांच्या भारत भेटीवर येणार आहेत.
न्यूझिलंडमध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये नवीन सरकार सत्तेवर आल्यापासून पहिल्यांदाच भारत भेटीवर येणारे पीटर्स अहमदाबाद आणि नवी दिल्लीला भेट देणार आहेत.
यापूर्वी फेब्रुवारी २०२० मध्ये न्यूझिलंडच्या तत्कालिन सरकारमध्ये उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री असताना ते भारत भेटीवर आले होते.
अहमदाबादमध्ये पीटर्स गुजरातमधील नेत्यांची भेट घेणे अपेक्षित आहे.
नवी दिल्लीत आल्यावर परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्याबरोबर पीटर्स द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही त्यांची द्विपक्षीय चर्चा होणार आहे. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांचा आढावा यावेशी घेतला जाणार आहे.
भारत आणि न्यूझिलंडदरम्यान व्यापार, अर्थकारण, संरक्षण, सुरक्षा, शिक्षण, संशोधन आणि वातावरण-पर्यावरण क्षेत्रातील सहकार्याचे संबंध आहेत. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध १९५२ मध्ये सुरू झाले. ऑक्टोबर २०११ मध्ये न्यूझिलंडने ओपन डोअर्स टू इंडिया धोरण स्वीकारले आहे.