नवी दिल्ली – जगातील सर्वात जास्त उंचीवर (१३००० फूट) बांधलेला सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, बहुप्रतिक्षित आणि सर्वात लांब बोगद्याचे (सेला पास) उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. सेला टनेल हा दुहेरी मार्गाचा बोगदा असून सर्व हवामानात हा बोगदा अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामिंग आणि तवांग जिल्ह्यांना जोडेल. तसेच भारत-चीनदरम्यानच्या सीमेवर अर्थात प्रत्यक्ष ताबारेषेवर पोहोचण्याचा हा एकमेव मार्ग आहे. आपल्या ईशान्य भारताच्या भेटीमध्ये शनिवारी अरुणाचल प्रदेशमध्ये मोदींनी हजारो कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.
या बोगद्याची गरज का आहे?
सेला पास येथे सध्या भारतीय लष्कराचे सैनिक आणि परिसरातील लोक तवांगला जाण्यासाठी बलीपारा-चरिदुर रोडचा वापर करत आहेत. हिवाळ्यातील अतिवृष्टीमुळे सेला खिंडीत प्रचंड बर्फ साचतो. त्यामुळे रस्ता पूर्णपणे बंद झालेला असतो. तसेच, या खिंडीमध्ये ३० दुर्गम वळणे आहेत. त्यामुळे येथील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झालेली असते. प्रवासासाठी कित्येक तास वाट पाहावी लागते. या काळात संपूर्ण तवांग क्षेत्र देशाच्या इतर भागापासून तुटते. सेला पास बोगदा सध्याच्या रस्त्याला बायपास करेल आणि तो बैसाखीला नुरानंगला जोडेल. याव्यतिरिक्त, सेला बोगदा सेला-चारबेला रिजमधून कापतो, जो तवांग जिल्ह्याला पश्चिम कामेंग जिल्ह्यापासून वेगळे करतो.
सेला प्रकल्पाची लांबी ११.८४ किमी
बोगदा प्रकल्पाची एकूण लांबी ११.८४ किमी आहे. यामध्ये बोगदे आणि रस्त्यांचा समावेश आहे. पश्चिम कमिंग जिल्ह्याकडे (बैसाखी) ७.२ किमीनंतर आपण बोगदा-१ मध्ये प्रवेश करतो. त्याची लांबी सुमारे एक किमी आहे. यानंतर एक रस्ता येतो, ज्याची लांबी १.२ किमी आहे. यानंतर बोगदा-2 येतो ज्याची लांबी १.६ किमी आहे. बोगद्यातून बाहेर पडल्यावर तिसरा रस्ता आहे, जो नुरानंगकडे जातो, त्याची लांबी ७७० मीटर आहे.
सेला प्रकल्पाची वैशिष्ट्ये
१. सेला बोगदा १३,५०० फुटांपेक्षा जास्त उंचीवरचा जगातील सर्वात मोठा बोगदा
२. बोगदा १ आणि बोगदा २ अरुणाचल प्रदेशातील तवांग आणि पश्चिम कामेंग जिल्ह्यांना जोडेल
३. प्रकल्पाची एकूण लांबी ११.८४ किमी
४. १५९१ मीटर दुहेरी वाहिनी असून दुसरा बोगदा ९९३ मीटर लांब आहे.
५. बोगदा २ मध्ये रहदारीसाठी बाय-लेन ट्यूब आणि एस्केप ट्यूब
६. मुख्य बोगद्यासोबतच त्याच लांबीचा समांतर आपत्कालीन बोगदा
७. हे बोगदे पूर्णपणे स्वदेशी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज
८. बर्फवृष्टीचा बोगद्यावर कोणताही परिणाम होणार नाही.
९. प्रवासाचे अंतर सहा किमीने कमी झाल्याने दीड तासाचा वेळ वाचेल
संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्व
१. सेला पास ३१७ किमीच्या बालीपारा-चहारद्वार-तवांग रस्त्यावर
२. तवांग सेक्टरमधील एलएसीला पोहोचण्याचा एकमेव मार्ग
३. प्रत्येक हंगामात खुलेअसल्याने लष्करासह सर्वांची सोय
४. सैन्य वेगाने पुढे पोचेल, चीनला चोख प्रत्युत्तर देऊ शकेल
५. एकूण अंदाजे खर्च ६४७ कोटी रुपये
६. उणे २० अंश तापमानातही काम सुरू राहिले