पुणे :- इंडियन ऑइल अल्टिमेट टेबल टेनिस सीझन 4 मध्ये पदार्पणातच आपली छाप पाडण्यासाठी बंगळुरू स्मॅशर्स संघाने कंबर कसली आहे. गुरुवारपासून सुरू झालेल्या या लीगसाठी बंगळुरू स्मॅशर्सने आपल्या जर्सीचे पुण्यात अनावरण केले.
संघाचे मालक पुनित बालन यांच्यासह भारताची स्टार खेळाडू मनिका बात्रा, प्रशिक्षक सचिन शेट्टी (भारत) आणि वेस्ना ओजस्टरसेक (स्लोव्हेनिया) यांच्यासह संपूर्ण स्मॅशर्स संघ जर्सी अनावरणप्रसंगी उपस्थित होते.
पुण्यात संपूर्ण संघाचे स्वागत करताना पुनित बालन ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पुनित बालन यांनी सांगितले की, या लीगचा भाग असल्यामुळे आम्हाला टेबल टेनिसला सपोर्ट करण्याची आणि हा खेळ पुढील स्तरावर घेऊन जाण्यासाठी संधी मिळाली आहे. भारतीय खेळ आणि खेळाडूंच्या पाठीशी उभे राहणे, त्यांच्या प्रवासात योगदान देणे, त्यांची स्वप्ने साकार करणे, भारतासाठी ऑलिम्पिक आणि इतर पदके जिंकणे हा दृष्टिकोन राहिला आहे.
खेलरत्न पुरस्कार विजेती मनिका बात्रा, कझाकस्तान मधील लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आणि ऑलिम्पियन किरील गेरासिमेन्को, ऑलिम्पियन आणि युरोपियन सांघिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेती पोलंडची नतालिया बॅजोर परदेशी खेळाडूंसह अनुभवी सनील शेट्टी आणि पोयमंती बैस्या व जीत चंद्रा या युवा खेळाडूंसह हा संघ परिपूर्ण झाला आहे.
आशियाई स्पर्धेच्या तयारीसाठी इंडियन ऑईल अल्टिमेट टेबल टेनिस सीझन 4 हे परिपूर्ण व्यासपीठ आहे आणि मी बंगळुरू स्मॅशर्ससाठी माझे सर्वोत्तम देण्याच्या प्रतीक्षेत आहे, असे जागतिक क्रमवारीत 35व्या क्रमांकावर असलेल्या मनिका बात्राने जर्सी अनावरणाच्या कार्यक्रमात म्हटले.
बंगळुरू स्मॅशर्सचे प्रशिक्षक सचिन शेट्टी म्हणाले, संघ चांगला दिसत आहे. खेळाडू एकत्रित चांगला खेळ करण्यासाठी उत्सुक आहेत. आमची नुकतीच भेट झाली असली तरी, खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफमध्ये चांगले संबंध निर्माण आहेत. एक संघ म्हणून तिथे जाऊ आणि प्रत्येक सामना जिंकण्याचा
प्रयत्न करू.
थेट प्रक्षेपणाद्वारे अनुभवा थरार ..
स्पर्धा श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे 30 जुलैपर्यंत रंगणार आहे. स्पोर्टस 18 आणि जीओ सिनेमावरून होणाऱ्या थेट प्रक्षेपणाद्वारे या लीगचा थरार चाहत्यांना अनुभवता येणार आहे.
चेन्नईची विजयी सलामी…
अल्टिमेट टेबल टेनिस लीगमध्ये गतविजेत्या चेन्नई लायन्सने यजमान पुणेरी पलटणचा 10-5 असा पराभव केला.
निकाल : अचंथा शरथ कमल 2-1 ओमर अस्सार (11-10, 9-11, 11-6), यांझी लियु 2-1 अर्चना कामथ (11-5, 11-10, 10-11), शरथ-यांझी 3-0 ओमर-अर्चना (11-5, 11-8, 11-2), बेनेडिक्ट डुडा 2-1 मनुष शहा (11-9, 11-7, 7-11), सुतिर्था मुखर्जी 1-1 हॅना मेतेलोव्हा (6-11, 11-5, 2-11).