धनकवडी –महापालिकेकडून शहर तसेच उपनगरांतील नालेसफाईचा विषयावर एप्रिल ते मे महिन्यांत निर्णय घेतले जातात. परंतु, सध्या पालिकेवर प्रशासक असल्या कारणाने या विषयाकडे दुर्लक्ष होत असल्याने यावेळी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई होणार की नाही? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे.
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार या महिन्यात दि. 25 पर्यंत पुणे शहर परिसरात मुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच, मे महिना सोडला तर पावसाळ्यापूर्व नालेसफाईची कामे सुरू होणे गरजेचे आहे. ढगफुटीसदृश पावसामुळे शहर, उपनगराला मोठा तडाखा बसून वित्तहानी यापूर्वी झालेली आहे. ओढ्याच्या बाजूचा परिसरामध्ये पाणी शिरून अनेक कुटुंब बेघर झाल्याची घटना अद्यापही कोणी विसलेले नाही. त्यामुळे यावर्षी आंबील ओढ्यासह अशा घटना घडू नयेत म्हणून प्रशासक काय उपाययोजना करणार यासह पावसाळा पूर्व दुरुस्तीची कामे धनकवडी परिसरात केव्हा सुरू करणार हे महत्त्वाचे ठरत आहे.
पावसाळापूर्व ओढ्याची तसेच सांडपाणी वाहिन्या, अंतर्गत गटारे स्वच्छ करण्याची कामे सुरू होणे गरजेचे असल्याची मागणी धनकवडी येथील राजमुद्रा सोसायटी ते नवरंग सोसायटी, साई जिम ते गुलाबनगर, राऊत बाग येथील नागरिकांकडून करण्यात आली आहे. तसेच, रस्ते अंतर्गत पावसाळी सांडपाणी वाहिनीचे स्वच्छतेचे कामही टप्प्याटप्प्याने मे अखेरपर्यंत पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. धनकवडी येथे राऊत बाग, गुलाबनगर या परिसरामध्ये ढगफुटीसदृश पावसाचा मोठा फटका यापूर्वी बसलेला आहे. त्यामुळे यावर्षी या भागातील पावसाळापूर्व सफाईची कामे लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होऊ
लागली आहे.