नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने नोटबंदीविषयी दिलेल्या निकालाचे भाजपने स्वागत केले. तसेच, नोटबंदीवर केलेल्या टीकेबद्दल कॉंग्रेस नेते राहुल गांधी माफी मागणार का, असा सवालही केला. न्यायालयाचा निकाल ऐतिहासिक आणि राष्ट्रहिताचा आहे. नोटबंदीमुळे टेरर फंडिंगला आळा बसला. त्यामुळे तो निर्णय दहशतवादासाठी मोठा हादरा ठरला.
शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढणार; सीबीआय, ईडीकडे तक्रार दाखल
प्राप्तिकर वसुली वाढून अर्थव्यवस्था स्वच्छ झाली. नोटबंदीनंतर डिजिटल व्यवहार वाढले. आता भारताने डिजिटल पेमेंट क्षेत्रात जगात आघाडीवर असणाऱ्या देशांमध्ये स्थान मिळवले आहे. मोदी सरकार गरिबांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे. त्यादृष्टीनेही नोटबंदीच्या निर्णयाला महत्व होते, अशी भूमिका भाजपच्या वतीने माजी केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
नोटबंदी निर्णयावर सातत्याने टीका केल्याबद्दल त्यांनी कॉंग्रेसवर शाब्दिक हल्लाबोल केला. राहुल तर देशाबाहेरही त्या निर्णयाविरोधात बोलत होते. आता न्यायालयाने निकाल दिल्यानंतर कॉंग्रेसचे नेते केवळ एका न्यायाधीशांनी नोंदवलेल्या विरोधी मताकडेच लक्ष वेधत आहेत, अशा शब्दांत प्रसाद यांनी नाराजी व्यक्त केली.