पुणे – शहरात गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात डीजे आणि लेझर लाइटचा वापर करण्यात आला होता. यातून अनेक तरुणांच्या डोळ्यांना इजा होणे, प्रचंड डोकेदुखी, कानाला इजा अशा घटना घडल्यानंतर आता नवरात्रोत्सवाही असाच प्रकार होणार का? अशी चर्चा सुरू असतानाच नाशिक पोलीस आयुक्तांनी नवरात्रात डीजे आणि लेझरवर निर्बंध घातले आहेत.
तसेच, नवरात्रोत्सवात लेझर आणि डीजेचा वापर करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पुणे पोलीसही असा निर्णय घेणार का? याकडे पुणेकरांचे लक्ष असणार आहे. दरम्यान, विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांवर तसेच डीजे वाजवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विसर्जन मिरवणुकीत सार्वजनिक मंडळांनी डीजेचा दणदणाट व लेझरचा झगमगाट करत पोलिसांचे आदेश पायदळी तुडवले होते.
विसर्जन मिरवणुकीत आवाजाच्या मर्यादा ओलांडल्या गेल्या होत्या, यावर पुणेकरांनी त्रास झाल्याबाबतच्या तक्रारीही केल्या होत्या. त्यामुळे शहर पोलिसांनी डीजेचा दणदणाट करणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल केले, याबाबत पुणेकरांनी समाधान व्यक्त केले असले तरी नवरात्रात डीजे, लेझरची पुनरावृत्ती नको, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मंडळांकडून सकारात्मक निर्णय…
पुणे शहरात गणेशोत्सवात डीजे, लेझर लाइटचा वापर मोठ्या प्रमाणात झाल्याने त्याच विपरीत परिणाम होऊन काहींच्या डोळ्यांना इजा झाली, एका तरुणांला 70 टक्के अंधत्व आले. तर, डीजेच्या आवाजाची पातळी मर्यादेपेक्षा अधिक असल्याने त्यातून अनेकांना प्रचंड डोकेदुखीचा त्रास झाला, काहींना ऐकू येण्यावर परिणाम झाला, अशा घटनांतून धडा घेत कोथरूड येथील गणेश मंडळाने यापुढे गणेशोत्सवात डीजे आणि लेझर लाइटचा वापर करणार नसल्याची शपथ घेतले.
यातील आणखी एक पाऊल पुढे उचलत डीजे आणि लेझरमुक्त आंबेडकर जयंती साजरी करण्याचा निर्धार शुक्रवारी (दि.6) आंबेडकरी बांधवांनी घेतला. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर डीजे आणि लेझर लाइट मुक्त करण्याकडे सकारात्मक पावले उचलली जात असल्याने जागरूक समाजाकडून स्वागत होत आहे; परंतु या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.
गरबा, दांडियात डीजे नको…
नवरात्रोत्सवात गरबा, दांडियाचे आयोजन शहरात ठिकठिकाणी केले जाते, अशा ठिकाणीही डीजेचा मोठा वापर केला जातो, झगमगाटासाठी लेझर लाइटही वापरली जाते, गणेशोत्सवातील घटना पाहता नवरात्रोत्सवात गरबा व दांडिया आयोजित करणाऱ्या मंडळांना डीजे लावण्यास पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात यावी, तसेच साउंड सिस्टिमच्या वापरावरही कडक मर्यादा आणाव्यात, नियमांचे पालन न करणाऱ्यांवर जागेवरच गुन्हे दाखल करावेत अशी अपेक्षा पुणेकरांकडून व्यक्त केली जात आहे.