बारामती – भोंडवेवाडी (ता. बारामती) येथे ओढा खोलीकरण करण्यात आलेले होते. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्याचा साठा होऊन जलसंधारण झाल्याने जलपूजन करण्यात आले.
ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामती आणि टेस्टी बाईट फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी या गावांमध्ये सुरू असलेला एकात्मिक शेती व्यवस्थापन या प्रकल्पा अंतर्गत ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,प्रा.निलेश नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
या कार्यक्रमासाठी केंद्रातील डॉ. रतन जाधव, संतोष कारंजे, टेस्टी बाईट फौंडेशनचे सीएसआर प्रमुख रवी मोहन, सहकारी बारामती दूध संघाचे माजी संचालक आप्पासो शेळके, भोंडवेवाडीच्या माजी सरपंच उषा भोंडवे, प्रगतशील शेतकरी राहुल भोंडवे, प्रभाकर भोंडवे (वकिल), आबासो शेळके तसेच केंद्रातील प्रकल्प अधिकारी वैभव घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
भोंडवेवाडी गावामध्ये शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे विषय विशेषज्ञ, डॉ. रतन जाधव यांनी आंतरपीक पद्धतीचे हरभरा व एरंडी या विषयावर या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व केंद्रातील विशेष विशेतज्ज्ञ पीक शास्त्रचे संतोष कारंजे यांनी आंतरपीक पद्धतीने जवस व एरंडी तसेच हरभरा व सूर्यफूल या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी भोंडवेवाडी गावातली 39 प्रगतील शेतकरी व महिला शेतकरी उपस्थित होत्या.भोंडवेवाडी गावचे माजी सरपंच सोपान भोंडवे यांनी आभार मानले.