नवी दिल्ली : आपली उत्क्रांती एका लहान जीवाणूपासून सुरू झाली. रेंडम नॅच्युरल सिलेक्शनच्या या कोट्यवधी वर्षांच्या प्रक्रियेमुळेच आज आपण मानव बनलो आहोत. आगामी काळात आपली प्रगती कशी होईल? त्याचा निर्णयही नैसर्गिक निवडीच्या आधारावर असेल की नाही? मानव आज त्या टप्प्यावर उभा आहे, जिथे आपल्या उत्क्रांतीचे स्वरूप भविष्यात कसे असेल हे ठरवणे कठीण झाले आहे.
आता आपण रेंडम नॅच्युरल सिलेक्शनच्या आधारे पुढे जाऊ की येणार्या भविष्यात आपला रंग, रूप, विचार आणि समजशक्ती कशी असेल हे व्यक्ती स्वतः ठरवेल? जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात असे शोध लावले जात आहेत, जे भविष्यात आपल्याला ‘सायबोर्ग’ बनवू शकतात. एलोन मस्क यांच्या खासगी कंपनी न्यूरालिंकने गेल्या काही वर्षांत या क्षेत्रात अनेक मोठे शोध लावले आहेत. आज आपण जाणून घेऊया की सायबोर्ग म्हणजे काय आणि येणाऱ्या काळात तंत्रज्ञान आपले स्वरूप कसे बदलणार आहे?
सायबोर्ग ही भविष्यातील मानवा बद्दल एक गृहीतक आहे. भविष्यात सायबॉर्ग्स हे असे मानव असतील, ज्यांच्या शरीरात अनेक प्रकारची मशीन्स आणि मेंदूच्या चिप्स असतील. या मशीन्स आणि ब्रेन चिपच्या मदतीने माणसाची शारीरिक आणि मानसिक क्षमता आजच्या तुलनेत अनेक पटींनी वाढणार आहे. या दिशेने अनेक कामे सुरू आहेत. न्यूरालिंक येथे काम करणारे शास्त्रज्ञ एक विशेष प्रकारची चिप बनवत आहेत, जी तुमच्या मेंदूच्या न्यूरल नेटवर्कशी थेट जोडली जाईल.
या चिपच्या मदतीने भविष्यात मानवी वर्तन, त्यांची विचार करण्याची क्षमता आणि शारीरिक ताकद वाढवता किंवा कमी करता येऊ शकते. एलॉन मस्क म्हणतात की, आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठा धोका मानवांसमोर उभा आहे. अशा परिस्थितीत या जगात आपले अस्तित्व वाचवण्यासाठी मानवाला भविष्यात सायबोर्ग बनावे लागणार आहे. हे लक्षात घेऊन आम्ही हे काम करत आहोत. आमचे हे तंत्रज्ञान भविष्यात मानवाची मानसिक आणि शारीरिक क्षमता वाढवण्याचे काम करेल, जेणेकरून ते येणाऱ्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा मुकाबला करू शकतील.
ब्रेन चिप तंत्रज्ञान ही शतकातील सर्वात मोठी क्रांती ठरू शकते. याच्या मदतीने दिव्यांग पुन्हा बरे होऊ शकतात. याशिवाय, या चिपच्या मदतीने मानवी मेंदू आणि मशीनमध्ये इंटरफेस तयार करण्यात मदत होईल.