पुणे : 12 फेब्रुवारी 1949 रोजी जन्मलेले गुंडप्पा रंगनाथ विश्वनाथ भारताचे माजी क्रिकेटपटू आहेत ज्यांनी जवळपास दीड दशकांच्या कारकिर्दीत 91 कसोटी आणि 25 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले. विशी या टोपननावाने प्रसिद्ध असलेले विश्वनाथ मोहक फलंदाज तर होतेच, याबरोबर ते वेगवान आणि फिरकी गोलंदाजीमध्ये तितकेच पारंगत होते.
मोहम्मद अझरुद्दीन आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या आगमनाच्या आधी विश्वनाथ यांची मनगटी फलंदाजी पाहण्यासारखी होती. त्यांनी फलंदाजीची शैली एका वेगळ्या पातळीवर नेली. निवृत्तीनंतरही त्यांचा खेळाशी असलेला संबंध कायम राहिला, कारण त्यांनी आयसीसी सामनाधिकारी आणि राष्ट्रीय निवडकर्ता म्हणून काम केले. त्यांनी भारतासाठी 91 कसोटी खेळल्या ज्यात 14 शतके आणि 35 अर्धशतकांसह 41.93 च्या सरासरीने 6080 धावा केल्या. आज दिग्गज गुडंप्पा विश्वनाथ त्यांच्या 73 वा वाढदिवस साजरा करत आहेत. या निमित्ताने विश्वनाथ यांच्याबद्दलच्या काही रोचक गोष्टी जाणून घेणार आहोत.
भावाकडून क्रिकेट खेळण्याची प्रेरणा
विश्वनाथ यांनी त्यांचा भाऊ जगन्नाथ आणि शेजारी एस कृष्णा यांच्यापासून क्रिकेट खेळण्याची प्रेरणा घेतली. ते दोघेही चांगले क्लब खेळाडू होते आणि त्यांनी विश्वनाथ यांच्या खेळात प्रगती करण्यात मोठी भूमिका बजावली. त्यांचा भाऊ ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा खूप मोठा चाहता होता, आणि ऑस्ट्रेलियाच्या सामन्यांचे समालोचन ऐकण्यासाठी तेे विश्वनाथ यांना पहाटे लवकर उठवायचे.
रणजी चषकाच्या पदार्पणात द्विशतक
विश्वनाथ यांना त्यांच्या उंचीमुळे आणि नाजूक शरिरयष्टीमुळे अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागले. विशेष म्हणजे, कर्नाटक राज्य ज्युनियर संघाच्या निवड समितीने तो प्रातिनिधिक क्रिकेट खेळण्यासाठी खूप लहान असल्याचे नमूद केले होते. तथापि, सर्व अडथळे, पार करत संघात स्थान मिळण्यात विश्वनाथ यशस्वी ठरले आणि पहिल्याच सामन्यात शतक साजरे केले. नंतर, जेव्हा त्यांची कर्नाटक रणजी चषक संघासाठी निवड झाली तेव्हा त्यांनी पदार्पणातच नाबाद द्विशतक ठोकले.
कसोटी पदार्पणात शतकी खेळी
1969 मध्ये कानपूर येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वनाथ यांचे आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण झाले. मात्र त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात अंत्यन निराशाजनक झाली. कारण ते पहिल्या डावात शून्यावर बाद झाले.
पण त्याचा कर्णधार टायगर पतौडी यांनी दिलेल्या सल्ल्यामुळे चमत्कार घडला. टायगर त्याला म्हणाले, आराम कर, काळजी करू नकोस, तुझे दुसर्या डावात शतक होईल. आणि नेमके तेच झाले. विश्वनाथ यांनी दुसर्या डावात 137 धावा केल्या. या खेळीत तब्बल 25 चौकारांचा समावेश होता. अशा प्रकारे पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शून्य धावा आणि शतक झळकावणारे तेे पहिला क्रिकेटपटू ठरले.
विश्वनाथ यांनी शतक केले की भारताचा विजय नक्की असायचा
विश्वनाथ कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे भाग्यशाली शुभंकर होते, कारण त्यांनी शतक केलेल्या सामन्यात भारत कधीही हरला नाही. त्याची पहिली कसोटी अनिर्णित राहिली, तर उरलेल्या 13 सामन्यांमध्ये त्यांनी शतक ठोकल्यानंतर भारताचा विजय झाला.
ऐतिहासिक विजयात शतकी खेळी
1976 मध्ये, त्रिनिदादमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध, भारताने 403 धावांच्या विजयाच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करून इतिहास रचला. गावस्करच्या 102 धावांनी विजयाचा पाया रचला, तर विश्वनाथ यांच्या नाबाद 112 धावांच्या जोरावर भारताने बलाढ्य वेस्टइंडिजला त्यांच्याच देशात धुळ चारली.