संतोष गव्हाणे पुणे, दि. 25 – पुणे महापालिकेची मुदत सहा महिन्यांपूर्वीच संपुष्टात आली आहे. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि ओबीसी आरक्षण यामुळे फेब्रुवारी 2022 मध्ये निवडणूक होऊ शकली नाही. त्यामुळे राज्यशासनाने पालिकेवर प्रशासकांची नियुक्ती केली. त्यानंतर, प्रशासकीय राजवट पूर्ण होण्यापूर्वी निवडणुका जाहीर होतील, असा अंदाज बांधला जात होता. परंतु, तोही चुकला. सर्वोच्च न्यायालयाने महापालिकांच्या प्रभागरचनेतील बदल, सदस्य संख्येत सुधारणा आणि ओबीसी आरक्षण लागू करण्याबाबत आता “पाच आठवडे जैसे थे’ स्थिती ठेवण्याचा आदेश दिल्याने निवडणूक पुन्हा लांबणीवर पडली आहे. अंदाजे जानेवारी 2023 मध्ये निवडणुकीच्या काही हालचाली होऊ शकतील त्यातही या प्रकरणात एखादी याचीका दाखल झाली तर निवडणूका आणखी चार-सहा महिने पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कागदोपत्री नियोजन पूर्ण…
राजकीय पक्षांनी आता बहुतांशी कार्यक्रम गुंडाळले आहेत. राज्यात सध्या शिंदे गट आणि ईडी सरकारची हवा असल्याने पदाधिकारीच काय तर मोठे कार्यकर्ते बंडखोरी करतील की काय? याबाबतचा भरवसा राजकीय पक्षांना राहिलेला नाही. याच कारणातून अनेक पक्षांनी पद निवडीही लांबणीवर टाकल्या आहेत तर काही पक्षांनी त्या-त्या पदाधिकाऱ्यांची पदे कामय ठेवली आहेत. काही पक्षांनी सदस्य नोंदणी, संवाद यात्रा अशा उपक्रमांवर भर दिला आहे. शिवाय पक्षश्रेष्ठी तळागळातील कार्यकर्त्यांवर लक्ष ठेऊन आहेत. निवडणूक अनिश्चिततेमुळे गेल्या काही दिवसांपासून राजकीय पक्षांनी सार्वजनिक कार्यक्रमही कमी केले आहेत. वॉर्डात मेळावे, सभा, मोहिमा राबविण्याबरोबरच मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध उपक्रमांचे केवळ कागदोपत्री नियोजन अनेकांनी पूर्ण करून ठेवले आहे.
सर्वत्र अनिश्चिततेचे वातावरण…
फेब्रुवारीत 2022 मध्ये निवडणूक होणे अपेक्षित होते. परंतु, आता या वर्षीचा आठवा महिना ऑगस्टही संपत आला आहे. तरीही निवडणुकीबाबत कोणीही काही ठोस सांगू शकत नाही. याउलट
सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारमधील बंडखोर आमदार, शिवसेना कोणाची तसेच ओबीसी आरक्षणाचे मुद्दे रेंगाळले आहेत. यामुळे सर्वच राजकीय पक्षांतील “भावी नगरसेवकां’चा काही कार्यक्रमांतील सक्रिय सहभागही आता कमी झाला आहे. गेल्या दोन वर्षांत झालेला खर्च डोईजड झाला आहे, त्यात निवडणूक अनिश्चित आहे. याचाच परिणाम म्हणून निवडणुकीएवजी सर्वत्र अनिश्चततचेच वातावरण कायम आहे.
दोन वर्षांपासून तयारी…
महापालिका निवडणूक लढविण्यासाठी “भावी नगरसेवकांनी’ दोन वर्षांपासून म्हणजेच 2019-20 पासूनच तयारी सुरू केली होती. आपल्या परिसरातील मतदारांना खूश करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यावर “भावी नगरसेवकांनी’ भर दिला होता. याकरिता मोठ्या प्रमाणात खर्च केला. मात्र, जानेवारी 2022 पासून निवडणुकांच्या तारखा पुढे ढकलल्या जात आहेत. यातून मोठा खर्च झाला असल्याने हे “भावी नगरसेवक आता अक्षरश: वैतागले आहेत. निवडणुका नेमक्या कोणत्या महिन्यांत होणार, याबाबत कोणीही ठामपणे सांगू शकत नसल्याने सगळ काही अंदाजेच सुरू आहे.