प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 25 -थिएटर व्यावसायिकदृष्ट्या लोकप्रिय होण्यासाठी थिएटरस्टार निर्माण व्हावेत. त्यामुळे थिएटर अधिक समृद्ध होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ सिन-नाट्य कलावंत अंजन श्रीवास्तव यांनी केले.
सिनेक्षेत्रातील मान्यवर कलावंतांच्या कार्यकर्तृत्त्वाची माहिती असलेल्या डॉ. राजू पाटोदकर लिखित “चंदेरी सितारे’ या पुस्तकाचे प्रकाशन श्रीवास्तव यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे निवृत्त संचालक श्रीनिवास बेलसरे, तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ, पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वप्नील बापट तसेच नावीन्य प्रकाशनचे नितीन खैरे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रेक्षकांमुळे कलावंतांना ओळख मिळते. रंगमंच एक अशी बाब आहे, जिथे कधी ना कधी आपली ओळख निर्माण होते. अशा यशस्वी कलावंतांवर अशी पुस्तके प्रकाशित व्हावीत, असे सांगून हे पुस्तक हिंदी भाषेतही प्रकाशित व्हावे, अशी इच्छा श्रीवास्तव यांनी व्यक्त केली. आपल्या 55 वर्षांच्या नाट्य-सिनेक्षेत्रातील प्रवासही त्यांनी उलगडला. आपल्याला भेटलेल्या विविध लोकांबाबत त्यांच्याकडून येणाऱ्या अनुभवांची दैनंदिनी दररोज लिहावी, असा सल्ला देतानाच गाडगीळ यांनी आपल्या कारकिर्दीत घेतलेल्या विविध सिनेकलाकारांच्या मुलाखतीचे किस्सेही सांगितले.
डॉ. पाटोदकर यांनी आपल्या मुलाखतींद्वारे पडद्यावरील कलाकार पडद्याबाहेर काढण्याचे काम केले आणि ते पुस्तकरुपी उतरवले असे बेलसरे म्हणाले.
कलाकार माणूस म्हणून मोठे
25 कलावंतांपैकी 20 कलावंतांना प्रत्यक्ष भेटलो असून, त्यापैकी काहींबरोबर अभिनयाचे कामही केलेले आहे. हे कलावंत कलाकार म्हणून जसे मोठे आहेत, त्याप्रमाणेच माणूस म्हणूनही वेगळे असल्याचे त्यांच्याबरोबर बोलताना, राहताना अनुभवले आहे. तसेच या क्षेत्रातील अनुभवावर आधारित 10 पुस्तके प्रकाशित करण्यात येतील, अशी माहिती पाटोदकर यांनी दिली.