कात्रज, दि. 25 (प्रतिनिधी) – आयुष्यात तुम्हाला हव ते व्हा. पण, त्याआधी चांगला माणूस व्हा. अधिकार व कर्तव्य यांची जाणीव ठेवा.दृष्टिकोन मोठा ठेवून जगा. आपल्या मातीचा संस्कार कधीही विसरू नका. डोळ्यावर झापड लाऊन करिअरच्या मागे धावू नका तर आपली बुद्धिमत्ता आणि भावभावनांची सांगड घालून सर्वोत्तमाचा ध्यास घ्या, असे मार्गदर्शन खासदार अमोल कोल्हे यांनी केले.
कात्रज येथील हुजूरपागा प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत विद्यार्थिनींनी लोकशाही पद्धतीने निवडलेल्या नवनिर्वाचित मंत्रिमंडळाचा शपथविधीचा कार्यक्रम अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थित झाला. यावेळी माजी नगरसेवक प्रकाश कदम उपस्थित होते. महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन संस्थेच्या अध्यक्षा रेखा पळशीकर कार्यक्रम अध्यक्षस्थानी होत्या.
लोकशाही, निवडणूक आदी प्रक्रियेची माहिती व्हावी तसेच भावी पिढीत सुजाण आणि समृध्द नेतृत्व तयार व्हावे, या उद्देशाने सदर मंत्रीमंडळाची संकल्पना राबविली जात असल्याचे सांगून मंत्रिमंडळाला मुख्याध्यापिका ज्योती राजमणी, मुख्याध्यापिका मंगला वाघमोडे यांनी शपथ दिली. प्रास्ताविक महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन संस्थेच्या उपाध्यक्षा हिमानी गोखले यांनी केले. सूत्रसंचालन मोनाली तनपुरे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन स्वराज्यसभा विभागप्रमुख राजेंद्र मानेकर तसेच प्रसाद दीक्षित व सर्व सहकारी शिक्षकांनी केले.