बंडोबा होणार का थंड?

चॉंद शेख
-सहा मतदारसंघांत बंडखोरीवर लक्ष
-युतीच्या नेत्यांना करावी लागणार कसरत


नगर  – जिल्ह्यातील बाराही लढतीचे चित्र काल अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट होताना सहा मतदारसंघात सरळ लढती होत असून इतर सहा मतदारसंघात कोण माघार घेणार यावर तेथील चित्र सोमवारी दुपारनंतर स्पष्ट होईल. दरम्यान, बंडखोरी करणारे बहुतांशी शिवसेना व भाजपमधील असल्याने हे बंड शमविण्यासाठी युतीच्या नेत्यांना चांगलीच कसरत करावी लागणार असल्याचे दिसत आहे.

अकोले, संगमनेर, शिर्डी, नेवासा, राहुरी व कर्जत – जामखेड या सहा मतदारसंघात सरळी लढती होत आहेत. मात्र, पारनेर, कोपरगाव, श्रीगोंदा, श्रीरामपूर, नगर शहर व शेवगाव-पाथर्डी या सहा मतदारसंघात कोण माघार घेणार, यावर तेथील लढती निश्‍चित होणार आहेत. या सहा मतदारसंघात ज्यांनी बंडाचा झेंडा हाती घेवून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यांच्या बंडाचा यज्ञकुंड निवडणुकीत तेवत राहणार की पक्षश्रेष्ठींकडून मनधरणी… काही शब्द… तडजोड घेवून हे बंडोबा थंड होणार हे सोमवारी स्पष्ट होईल. या सर्व घडामोडीसाठी संबंधीतांकडे तीन दिवसांचा कालावधी असल्याने सध्या या सहा मतरदारसंघात वेगाने हालचाली घडत आहेत.

पारनेर मतदारसंघात शिवसेनेने चौथ्यांदा विधानसभेचे उपसभापती विजय औटी यांच्यावर विश्‍वास दाखवला आहे. त्यांच्याविरोधात पक्षाचे जिल्हा उपप्रमुख व जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रसने औटी यांच्यापासून दूर झालेल्या निलेश लंके यांना संधी देताना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे यांना डावलले आहे.त्यामुळे झावरे यांनी भाजपशी अर्थात विखे यांच्याशी जवळीक साधत अपक्ष अर्ज दाखल केला आहे. तर काल अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे कार्यकारिणी सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत चेडे यांनी अर्ज दाखल केला.

कार्ले औटी यांच्यासाठी तर झावरे लंके यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतात. कार्ले बंडाच्या पूर्ण तयारीत आहेत. झावरे यांची भूमिका विखेंच्या आदेशावर अवलंबून आहे. विशेष म्हणजे आजपर्यंत झावरे यांची भूमिका नेहमी विखे विरोधी राहिली आहे. चेडे यांनी अर्ज भरताना भाजपचे काही पदाधिकारी सोबत होते. हा औटी यांनी आम्हाला विश्‍वासात न घेतल्यास काय होवू शकते, असा अप्रत्यक्ष दिलेला इशारा मानला जात आहे. तरी सोमवारपर्यत पारनेरच्या नदीच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून जाणार आहे.

कोपरगावमध्ये भाजपच्या विद्यमान आमदार स्नेहलता कोल्हे व राष्ट्रवादीचे आशुतोष काळे हे प्रमुख उमेदवार असले तरी नगराध्यक्ष विजय वहाडणे व जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी दाखल केलेले अपक्ष अर्ज व या दोघांनीही लढण्यावर ठाम राहणार असल्याच्या घेतलेल्या भूमिका दोन्ही प्रमुख उमेदवारांना त्रासदायक ठरू शकतात. परजणे हे विखे यांचे मेहुणे आहेत. त्यांची उमेदवारी कायम राहिली तर ती कोल्हे यांना लाभदायक तर काळे यांना त्रासदायक तर वहाडणे कोल्हे यांच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. मात्र शेवटच्या क्षणी येथेही काही महत्वाच्या घडामोडी घडू शकतात.

शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात भाजपच्या आमदार मोनिका राजळे व राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे यांच्यासोबतच जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे व भाजपच्या युवा मोचाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे यांचे अपक्ष अर्ज आहेत. काकडे व गर्जे यांचे अर्ज शेवटच्या दिवशी निघू शकतात, अशी या मतदारसंघात चर्चा आहे. ते राहिले तर ढाकणे यांच्यापेक्षा राजळे यांची डोकेदुखी वाढेल. श्रीगोंदा मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राहुल जगताप यांनी लढण्यास असमर्थता दर्शविल्याने राष्ट्रवादीने भाजपचे बबनराव पाचपुते यांच्याविरोधात घनश्‍याम शेलार यांना रिंगणात उतरविले आहे.पण येथे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांनी अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे. त्यांनी अर्ज ठेवला तर शेलार यांच्यासाठी डोकदुखी ठरेल हे उघड आहे. त्यातच खा.सुजय विखे यांनी नागवडे यांना भाजपचे निमंत्रण दिले आहे.

श्रीरामपूरमध्ये शिवसेनेचे भाऊसाहेब कांबळे व कॉंग्रसचे लहू कानडे यांच्यात प्रमुख लढत मानली जात असली तरी येथे शिवसनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव चेतन लोखंडे यांचा अर्ज आहे. तसेच जिल्ह्यातील सर्वात जास्त 33 जणांचे 44 अर्ज या मतदारसंघात आलेले आहेत. निवृत्त शिक्षणाधिकारी रामचंद्र जाधव यांना सेना व कॉंग्रेसने उमेदवारी नाकारल्याने ते अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत. येथे उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी कांबळे यांच्याविरोधात झेंडा हाती घेतला आहे. ते यातील कुणाला पाठींबा देतात हेही महत्वाचे आहे. याठिकाणीही विखेंची भूमिका महत्वाची ठरणार आहे. नगर शहर मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार संग्राम जगताप व शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यात लढत होत असली तरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या श्रीपाद छिंदम यांना बसपाने उमेदवारी दिली आहे.

तसेच राष्ट्रवादीचे किरण काळे यांनी जगताप यांच्या विरोधात बंड करत वंचित आघाडीची वाट धरली आहे. येथे भाकपकडून भैरवनाथ वाकळे, मनसेकडून संतोष वाकळे, एमआयएमकडून नगरसेवक असिफ सुलतान रिंगणात उतरले आहेत. यातील बहुतेक कुणी माघार घेईल असे वाटत नाही. या उमेदवारांचा राठोड व जगताप यांतील कुणाला लाभ तर कुणाला तोटा पण होवू शकतो.
या सहा मतदारसंघातील बंडखोऱ्या थोपवण्यात संबंधीत उमेदवार व पक्षाला कितपत यश येते हे सोमवारी स्पष्ट होईल. तोपर्यंत दोन दिवसात अजूनही अनेक घडामोडी घडतील.

तर अकोलेमध्ये वैभव पिचड (भाजप )व किरण लहामटे (राष्ट्रवादी कॉंग्रेस), संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात (कॉंग्रेस) व साहेबराव नवले (शिवसेना), शिर्डीमध्ये राधाकृष्ण विखे (भाजप) व सुरेश थोरात (कॉंग्रेस), नेवासामध्ये बाळासाहेब मुरकुटे (भाजप )विरूध्द शंकरराव गडाख (शेतकरी क्रांतीकारक पक्ष राष्ट्रवादी पुरस्कृत), राहुरीत शिवाजी कर्डिले (भाजप) विरूध्द प्राजक्‍त तनपुरे (राष्ट्रवादी कॉंग्रेस )तर कर्जत-जामखेडमध्ये राम शिंदे (भाजप) विरूध्द रोहित पवार (राष्ट्रवादी कॉंग्रेस) यांच्यात या सहा मतदारसंघात सरळ लढती होत आहेत. मात्र, येथेही कोण कोणाबरोबर जाते यावर काही लढतींचे चित्र निर्णायक ठरू शकते. अकोले, नेवासा, शेवगाव-पाथर्डी या तीन मतदारसंघात ती शक्‍यता नाकारता येत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.