पुणे -“महाविकास आघाडीचा धर्म आम्ही पाळणार; मात्र, कसबा विधानसभा निवडणूक लढविण्याची आमचीही तयारी आहे. त्याबाबत आपल्याला ही जागा मिळावी, अशी मागणी पक्ष श्रेष्ठीकडे केल्याची माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शहर पदाधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे आता कॉंग्रेसपाठोपाठ ठाकरे गटानेही या जागेवर दावा सांगण्यास सुरूवात केल्याने कसबा विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी लढण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे आता दीड वर्षांसाठी असलेल्या या जागेवरून महाविकास आघाडीतही रस्सीखेच सुरू आहे. त्यातच, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही महाविकास आघाडी ही निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केल्याने तीनही पक्ष तयार असल्याचे चित्र आहे. ही निवडणूक जाहीर होताच, कॉंग्रेसने या जागेवर दावा केला होता. विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्र लढली होती. तर आघाडी म्हणून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र लढली होती. त्यात, कॉंग्रेसच्या वाट्याला ही जागा आली होती. तर भाजपने मुक्ता टिळक यांना उमेदवारी दिल्यानंतरही शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढविली होती. तर मनसेकडून अजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती. परिणामी, या मतदारसंघातून राष्ट्रवादी वगळता सर्व प्रमुख पक्षांचे उमेदवार मैदानात होते. आता राज्यातील चित्र बदलले असून शिवसेनेत फूट पडली आहे. तर, मनसे आणि भाजपच्या युतीची चर्चा असून शिवसेनेचा एक गट कॉंग्रेस- राष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडीत आहे. त्यामुळे कॉंग्रेसने या जागेवर दावा करताच शिवसेना ठाकरे गटानेही या जागेवर दावा केला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून शहर प्रमुख संजय मोरे आणि माजी नगरसेवक विशाल धनवडे पुन्हा इच्छूक असल्याचे पक्षाच्या शहर पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.