पाबळ – आंबेगाव-शिरूर मतदारसंघातील पाबळ येथे उभारण्यात आलेल्या अद्ययावत ग्रामीण रुग्णालयाची इमारत गेली चार वर्षे धूळखात पडली असूनही ते सुरू होत नसल्याचे पार्श्वभूमीवर काही संघटनांनी आंदोलनाची तयारी केली आहे. येत्या शनिवारी (दि. 28) प्राथमिक स्वरूपात ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
याबाबतीत पाबळ येथील श्रीमंत बाजीराव सांस्कृतिक प्रतिष्ठानने गंभीर भूमिका घेतली असून एक महिन्यापूर्वी लेखी निवेदन देऊनही व आंदोलनाचा इशारा देऊनही फक्त आश्वासने दिली जात असल्यामुळे नाईलाजास्तव सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू करण्यात येत आहे. प्राथमिक स्वरूपात ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष संजय डहाळे यांनी दिली.
तर या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व आरोग्य विभागाला पाठवण्यात आल्याची माहिती सचिव मारुती शेळके व सहसचिव चंद्रशेखर वारघडे यांनी दिली.
ससेहोलपट आजही सुरू
वास्तविक आठ वर्षांपूर्वी या रुग्णालयाची पायाभरणी झाली.त्यावेळी असलेल्या आरोग्य व्यवस्थेची व गोरगरिब रुग्णाची ससेहोलपट आजही सुरू आहे तर करोना कालालवधीतही मोठी हानी झाली असताना हे रुग्णालय सुसज्ज उभारणी होऊनही ते नागरिकांसाठीच उपलब्ध होत नाही ही बाब दुर्दैवी असल्याची माहिती खजिनदार दौलत गायकवाड यांनी दिली.
लवकरच सुरू होत असल्याचे पालुपद
श्रीमंत बाजीराव प्रतिष्ठानने वैद्यकीय अधीक्षक राऊत यांना याबाबतीत प्रत्यक्ष निवेदन दिले, त्याचवेळी इशाराही दिला होता; मात्र प्रत्येकवेळी एकच उत्तर, लवकरच रुग्णालय सुरू होईल हेच उत्तर मिळत असल्याने, नेमकी वस्तुस्थिती समजत नसल्याची बाब पुढे येत असली तरी गोरगरीब रुग्ण मात्र हतबल झाला असल्याची बाब प्रकर्षाने जाणवत आहे.