चंडिगढ – कॉंग्रेसचे पंजाब प्रभारी हरिष चौधरी यांनी पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्याविषयी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यामुळे कॉंग्रेस माजी क्रिकेटपटू असणाऱ्या सिद्धू यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईचा बडगा उगारणार का, याविषयीची उत्सुकता बळावली आहे.
पंजाबमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याने कॉंग्रेसला त्या राज्याची सत्ता गमवावी लागली. त्यानंतर सिद्धू यांना प्रदेशाध्यक्ष या पदावरून हटवण्यात आले. आता त्यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस करणारे चौधरी यांनी सोनियांना काही दिवसांपूर्वी पाठवलेले पत्र समोर आले आहे.
स्वपक्षाच्याच सरकारवर टीका न करण्याची सूचना सिद्धू यांना देण्यात आली होती. मात्र, त्यांनी ती ऐकली नाही. कॉंग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून अमरिंदर सिंग राजा वॉरिंग यांनी काही दिवसांपूर्वी सुत्रे स्वीकारली. त्या सोहळ्यावेळी नव्या प्रदेशाध्यक्षांचे केवळ अभिनंदन करून सिद्धू घाईघाईने निघून गेले.
पंजाब कॉंग्रेसमधील ऐक्याचे दर्शन घडवण्यासाठी राज्यातील सर्व प्रमुख नेते त्या सोहळ्याला पूर्ण वेळ उपस्थित राहिले. मात्र, सिद्धू यांनी तसे केले नाही. सिद्धू स्वत:ला पक्षापेक्षा मोठे असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे चौधरी यांनी त्या पत्रात नमूद केले आहे.