मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलच्या अडचणीत वाढ झाली आहे. फसवणूक प्रकरणी रांची सिव्हिल कोर्टाने तिच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. निर्माता अजय कुमार सिंह यांनी अमिषा पटेल आणि तिचा बिझनेस पार्टनर कुणाल यांच्यावर २.५ कोटींच्या फसवणुकीचा आरोप केला होता.
या प्रकरणी कोर्टाने अमीषा विरोधात आधी समन्स बजावले होते. पण, अमिषा पटेल कोर्टात न पोहोचल्याने कोर्टाने हे वॉरंट जारी केले. या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी १५ एप्रिल रोजी होणार आहे. अरगोरा येथील रहिवासी असलेल्या अजय कुमार सिंह यांनी १७ नोव्हेंबर २०१८ रोजी सीजेएम कोर्टात दोघांविरुद्ध खटला दाखल केला होता. त्यामुळे तिला अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
निर्माता अजय कुमार सिंह यांनी अमिषा पटेल आणि तिचा बिझनेस पार्टनर कुणाल यांच्या विरोधात फसवणुकीचा आरोप केला आहे. अजय कुमार सिंह यांनी सांगितले की, ‘देसी मॅजिक’ या सिनेमासाठी अमिषा आणि कुणाल यांनी २.५ कोटी रुपये घेतले होते. यानंतर चित्रपट २०१३ साली बनविण्यास सुरुवात झाली. २०१८पर्यंत हा चित्रपट पूर्ण होऊन रिलीज होईल, असे वचन अमिषाने मला दिले होते. मात्र चित्रपट अजूनही रिलीज झाला नाही.’
‘त्यानंतर अमिषाकडे निर्माता पैसे मागण्यास गेले असता तिने ३ कोटींचा चेक दिला. परंतु, बँकेत तो चेक बाउंस झाला. याबद्दल अमिषाला जाब विचारला असता तिने पॉवरफुल व्यक्तींसोबत फोटो काढून मला धमकविण्यास सुरुवात केली’, असे त्यांनी सांगितले. यापूर्वी मध्य प्रदेशातील खांडवा येथे देखील अमिषावर फसवणूक प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.