पत्नीच्या विरहाने पतीने घेतले पेटवून

सातारा – मोती चौकात गेली अनेक वर्षे गजरे विकणाऱ्या विजय श्रावण जाधव (वय 45, रा. प्रतापगंज पेठ, सातारा) यांनी पत्नीच्या विरहाने अंगावर पेट्रोल ओतून, पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी दुपारी मोती चौकातच घडली. या घटनेत 50 टक्‍के भाजलेल्या जाधव यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत जिल्हा रुग्णालयातील पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विजय जाधव हे गेल्या अनेक वर्षांपासून मोती चौकात गजरे विकतात. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यामुळे ते नेहमी मानसिक तणावाखाली असायचे. गुरुवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे गजरे विकण्यासाठी मोती चौकात आले. गणेशोत्सवाची धामधूम सुरू असल्यामुळे चौकात नेहमीपेक्षा जास्त गर्दी होती.

जाधव यांनी बाटलीतून आणलेले पेट्रोल अचानक स्वत:च्या अंगावर ओतून घेतले. कोणाला काही कळायच्या आत काडी ओढून स्वत:ला पेटवून घेतले. हा प्रकार तेथील इतर विक्रेत्यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी तत्काळ जाधव यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या घटनेत जाधव हे 50 टक्‍के भाजले आहेत. त्यांना गंभीर जखमी अवस्थेत मित्रांनी रिक्षातून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. शहरात भर गर्दीच्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने घबराट पसरली होती. विजय जाधव यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर तहसीलदारांनी त्यांचा मृत्यूपूर्व जबाब घेतला. त्यामध्ये पत्नीच्या विरहामुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्यांनी नमूद केले आहे. जाधव यांना एक मुलगा आणि एक मुलगी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली नव्हती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.