खंडणीसाठी कुटुंबाला मारहाण

कराड तालुक्‍यात घटना, युवतीवर केले चाकूने वार

कराड –
हजारमाची, राजारामनगर (ता. कराड) येथे खंडणीच्या कारणावरुन युवतीवर चाकूने वार केला. यावेळी तिच्या घरासमोर बेकायदेशीर जमाव जमवून घरातील साहित्याची मोडतोड करत चौघांना शिवीगाळ व लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद अजय महादेव सूर्यवंशी (वय 22, रा. हजारमाची राजारामनगर, ता. कराड) याने शहर पोलिसात दिली असून याप्रकरणी अकरा जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बाळू प्रकाश सूर्यवंशी, सोमनाथ अधिक सूर्यवंशी, तुषार प्रकाश सूर्यवंशी, सागर सुभाष सूर्यवंशी, आकाश उर्फ डाबर सर्जेराव पळसे, जमीर मुल्ला, भोल्या (पूर्ण नाव माहित नाही), जयदीप सुभाष कोरडे, दत्ता तानाजी कोरडे, सोन्या बाबासो सुर्यवंशी, अनिल खरात (पूर्ण नाव माहित नाही) सर्व रा. हजारमाची, ता. कराड) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, हजारमाची येथे बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास अजय सूर्यवंशी याच्या घरासमोर बाळू सूर्यवंशी याने बेकायदा जमाव जमवून गणपती व चिरमुरेचा धंदा करण्यासाठी 50 हजार रूपयांची खंडणी मागितली असता अजयने खंडणी न दिल्याच्या कारणावरून बाळू सूर्यवंशी व अन्य दहा संशयितांनी अजय सूर्यवंशी याच्या घरातील साहित्य विस्कटून खिडकीच्या काचा फोडून अजयचा भाऊ विक्रम, भावजय काजल, वडील महादेव यांना हाताने व लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करून अजयची बहिण सोनाली कोरडे हिस बाळू सूर्यवंशी याने तुझे लय झाले, तु याआधीही  आमच्यावर केस केली आहे, तुला आता जिवंत सोडत नाही, असे म्हणून तिच्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. जखमीवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतची फिर्याद अजय सूर्यवंशी याने शहर पोलिसात दिली आहे. याप्रकरणी अकरा जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी शहर पोलिसात फिर्यादीच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.