नवी दिल्ली – माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांची गुरूवारी येथील न्यायालयाने तिहार तुरूंगात रवानगी केली. आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणी 73 वर्षीय चिदंबरम यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
चिदंबरम यांना 21 ऑगस्टला रात्री अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना पाच टप्प्यांत मिळून 15 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली. त्या कोठडीची मुदत संपल्यानंतर चिदंबरम यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 19 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. त्यामुळे त्यांची रवानगी तुरूंगात झाली. चिदंबरम यांना आधीपासूनच झेड दर्जाची सुरक्षा उपलब्ध आहे. त्यामुळे न्यायालयाने त्यांना तुरूंगातील स्वतंत्र कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
त्यांना तुरूंगात औषधे नेण्याचीही परवानगी देण्यात आली. सुनावणीवेळी सीबीआयची बाजू मांडणाऱ्या सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी तुरूंगात चिदंबरम यांना पुरेशी सुरक्षा पुरवण्याची ग्वाही दिली. चिदंबरम यांची बाजू कॉंग्रेस नेते असणारे वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी मांडली. सिब्बल यांनी चिदंबरम यांना न्यायालयीन कोठडी देण्याच्या सीबीआयच्या मागणीला विरोध दर्शवला.
आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणाशी निगडीत मनी लॉण्डरिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी ईडीच्या कोठडीत जाण्याची चिदंबरम यांची तयारी असल्याचे सिब्बल यांनी नमूद केले. मात्र, न्यायालयाने सीबीआयची मागणी मान्य केली.