मुंबई : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे देशभरात पडसाद उमटत चालल्याचे दिसत आहेत. शेतकऱ्यांनी देशव्यापी भारत बंदची हाक दिल्यानंतर भाजपाच्या काही मित्रपक्षांसह विरोधी बाकांवरील राजकीय पक्षांनीही बंदला आपले समर्थन दिले आहे. महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेनेही पाठिंबा दिला आहे. त्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नामोल्लेख टाळत राऊतांवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमी शेतकाऱ्यांबरोबर होती आहे आणि राहणार पण आज आरडाओरडा करणारे राज्यसभेत मूग गिळून गप्प का बसले होते????
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) December 7, 2020
खासदार संजय राऊत यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहणार असल्याची घोषणा केली होती. शिवसेनेने पाठिंबा जाहीर केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी राऊत यांचा नामोल्लेख टाळत खोचक सवाल उपस्थित केला आहे. देशपांडे यांनी ट्विट करत “महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमी शेतकऱ्यांबरोबर होती आहे आणि राहणार, पण आज आरडाओरडा करणारे राज्यसभेत मूग गिळून गप्प का बसले होते????,” असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे.
मोदी सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीच्या सीमांना शेतकऱ्यांनी वेढा घातला आहे. चर्चेच्या पाच फेऱ्या पार पडल्यानंतरही केंद्र सरकार तोडगा काढण्यात अपयशी ठरलं आहे, तर दुसरीकडे शेतकरी आक्रमक होताना दिसत असून, उद्या भारत बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. शिवसेनेनं भारत बंदसह आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.