बारामती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा श्री गणेशाच्या मूर्ती 4 फुटांपेक्षा जास्त उंचीचा नको असा निर्णय जाहीर करण्यात आला पण आज राज्याचा विचार करता मूर्तीकारांकडे गणेश मंडळाच्या मागणीप्रमाणे 4 फुटापेक्षा जास्त उंचीच्या 70 हजार मूर्ती तयार करून ठेवल्या आहेत. फक्त रंगकाम बाकी आहे. या मूर्तींची किंमत अंदाजे 400 कोटीपेक्षाही जास्त असल्याने या मूर्तींचे करायचे काय? असा प्रश्न आता कुंभार समाजापुढे निर्माण झाल आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा हा निर्णय योग्य आहे. मात्र कुंभार मूर्ती कारागीर नेहमीप्रमाणे मोठ्या मूर्ती दिवाळी पासुनच बनविण्यास सुरुवात करतात त्यामुळे 4 फूटापेक्षा जास्त उंचीच्या हजारो मूर्ती बनवून तयार करण्यात आलेल्या आहेत. यातील 90 टक्पक्यांपेक्षा जास्त मूर्ती या पीओपीच्या आहेत. 1 जानेवारी 2021 पासून पीओपीवर बंदी आल्यामुळे या मूर्ती पुढील वर्षी कधी ही विकता येणार नाहीत. या मूर्ती विकल्या गेल्या नाहीत तर कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे.
पुणे जिल्ह्यात पुणे शहर, खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, भोर, मावळ, मुळशी, दौंड व हवेली या भागात मोठे गणपती बनविणारे कुंभार कारागिर आहेत. जिल्ह्यात गणपती बनविणारे एकूण 1 हजार 800 एवढे कुंभार असून त्यातील 200 कारागीर हे 4 फुटापेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती बनवितात. त्यामुळे या बनविलेल्या मूर्तींचा आर्थिक भार हा कुंभार समाजावर पडणार असल्याने त्यांचे आर्थिक कंबरडे मोडले जाणार आहे, तरी शासनाने काही तरी मध्यबिंदू काढून कुंभार समाजास न्याय द्यावा, अशी मागणी जोर धरीत आहे.
उपासमारी, आत्महत्येची येणार वेळ
मूर्तिकारांनी व्यवसायासाठी खासगी सावकाराकडून कर्ज उभारलेले असते. मूर्ती विकल्यानंतर त्याची दरवर्षी परतफेड केली जाते; परंतु या वर्षी मूर्ती विकता आल्या नाहीतर सावकारांचे कर्ज कोणतेही कारागिर परत करू शकणार नाहीत.त्यामुळे या कारागिरांवर फार मोठे आर्थिक संकट येणार आहे. तर कारागिरांना आर्थिक मदत मिळाली नाही तर अनेकांवर उपासमारीची तसेच आत्महत्याची वेळ येवू शकते.
‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुंभार समाज आर्थिक अडचणीत सापडला असून 4 फुटापेक्षा जास्त उंचीच्या मूर्तीचे तहसील कार्यालया मार्फत पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घातले आहे.’
– दत्ता कुंभार, अध्यक्ष, अखिल भारतीय प्रजापती कुंभार संघ, माती कला विभाग