द्रमुक ठामपणे कॉंग्रेसच्या पाठीशी का नाही? – अद्रमुकचा सवाल

चेन्नई – केंद्रात ज्या कोणत्या पक्षाचे सरकार स्थापन होईल त्या सरकारमध्ये सहभागी व्हायचे की नाही याचा निर्णय आम्ही नंतर घेऊ अशी प्रतिक्रीया द्रमुक पक्षाचे प्रमुख एम के स्टॅलिन यांनी दिली आहे. त्यावर अद्रमुक पक्षाने जोरदार आक्षेप नोंदवला आहे. आम्ही कॉंग्रेस बरोबरच राहु असे द्रमुकचे नेते ठामपणे का म्हणत नाहीत असा सवाल अद्रमुकने उपस्थित केला आहे. आपल्या पक्षाच्या मुखपत्रातून त्यांनी हा सवाल उपस्थित केला आहे.

केंद्रात कोणत्याही पक्षाचे सरकार स्थापन झाले तरी त्यात द्रमुक पक्ष सहभागी होऊ शकतो असा अर्थ यातून काढायचा काय असा प्रश्‍नही अद्रमुकने उपस्थित केला आहे. कोणत्या सरकार मध्ये सहभागी व्हायचे की नाही याचा निर्णय 23 मे नंतर घेऊ असे ते म्हणतात, याचा अर्थ ते ठामपणे कॉंग्रेस बरोबर जाण्याची शक्‍यता नाहीं असेच याचे संकत आहेत अशी टिपण्णीही यात करण्यात आली आहे. द्रमुक पक्ष हा युपीए आघाडीचा घटक पक्ष म्हणून लढला आहे. त्यामुळे आम्ही फक्त युपीए सरकारमध्येच सहभागी होऊ असे त्यांनी म्हणायला हवे होते. ज्या अर्थी ते असे म्हणत नाहीत त्या अर्थी ते आज कॉंग्रेस बरोबर ठाम नाहींत असेच यातून स्पष्ट होते आहे असे त्यांचे म्हणणे आहे.

तत्वाने राजकारण करणारा पक्ष कोणत्याही पक्षाच्या सरकारमध्ये सहभागी होण्याबाबतची इच्छा सूचित करू शकत नाही असेही या पक्षाने म्हटले आहे. प्रदेश भाजप अध्यक्ष तामिलीसाई सौंदरराजन यांनी द्रमुकचे नेते भाजपशी हातमिळवणी करण्याच्या चर्चेत आहेत असे विधान केले होते. त्यातूनच द्रमुकची दुटप्पी भूमिका स्पष्ट झाली आहे असेही अद्रमुकने म्हटले आहे. स्टॅलिन यांना केवळ सत्ता आणि मंत्रिपद हवे आहे त्यांना तत्वाच्या राजकारणाशी काहीही देणेघेणे नाही हेच यातून दिसून आले आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.