पुणे : प्रभागात समान पाणी योजनेचे काम करण्यापूर्वी आम्हाला भेटला का नाही..? अशी विचारणा करत महापालिकेच्या ठेकेदाराला भाजपच्या महापालिकेतील एका पदाधिकाऱ्याने आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, मारहाणीनंतर दुसऱ्याच दिवशी हे प्रकरण वाढू नये याची दक्षता घेण्यात आली असून या प्रकरणी पालिका प्रशासनावरही दबाव टाकला जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे,महापालिकेत गेली पाच वर्षे सत्तेत असलेल्या भाजपवर विरोधकांकडून भ्रष्टाचाराच्या करण्यात येत असलेल्या आरोपांचे असे प्रकार पुरावेच असल्याची चर्चा राजकीय वर्तूळात रंगली आहे.
महापालिकेतील सत्ताधारी भाजपचा समान पाणी योजना हा महत्वांकांक्षी प्रकल्प असून तो आधीच उशीर झाल्याने महापालिका निवडणूकांमध्ये पक्षाला फटका बसेल म्हणून तो वेगाने पूर्ण करण्यासाठी भाजपकडून पाठपुरावा सुरू आहे. परिणामी, प्रशासनाकडून शहरभर खोदाईसाठी बंदी असतानाही समान पाणी योजनेसाठी पावसाळयातही जलवाहिन्या टाकण्यासाठी खोदाईस सहमती दिली आहे. त्यानुसार, जलवाहीनीचे काम मिळालेल्या कंपनीने एका सब कॉन्ट्रॅक्टरकडे हे काम दिले आहे. महापालिकेस सूचना देऊन मार्केटयार्ड परिसरात हा ठेकेदार खोदाई सुरू करण्यास गेला होता.
त्यावेळी महापालिकेतील एका माजी पदाधिकाऱ्याच्या कार्यकर्त्यांनी ठेकेदारास काम करण्यास मनाई केली. तसेच, आमच्या साहेबांना का भेटला नाही.. कामाची कल्पना का दिली नाही अशी विचारणा केली. मात्र, आता महापालिकेत नगरसेवक अस्तित्वात नसल्याने तसेच पदाधिकारीपदही नसल्याने या ठेकेदाराने “मी तुमच्या साहेबांना ओळखत नाही.. ” असे सांगत काम सुरूच ठेवले. त्यामुळे संतापलेल्या या पदाधिकाऱ्याने कार्यकर्त्यांसह ठेकेदाराला मारहाण केली. त्यानंतर हे प्रकारण आंगलट येण्याची शक्यता लक्षात घेऊन दुसऱ्या दिवशी हे प्रकरण मिटविण्यात आले आहे. मात्र, या प्रकरणाची चांगलीच चर्चा महापालिकेत रंगली असून, “या पूर्वी याच ठेकेदाराने साहेबांना भेटून काम होते तेव्हा या साहेबांनी या ठेकेदाराचे कौतुक केले होते. मात्र, अचानक काय झाले अशी चर्चा प्रशासकीय वर्तूळात रंगली आहे.