बंगालचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात, आमच्या सरकारांनी निदर्शकांना कुत्र्यांप्रमाणे गोळ्या घातल्या
उत्तरप्रदेशच्या मंत्र्याने केली मोदी, योगीविरोधी घोषणा देणाऱ्यांना जिवंत गाडण्याची भाषा
कोलकता : वादग्रस्त ठरलेल्या नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या (का) विरोधात देशभरात निदर्शनांचे सत्र सुरू आहे. अशातच भाजपच्या काही नेत्यांची मुक्ताफळे वादंगाला कारणीभूत ठरत आहेत.
भाजपचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आणि त्या पक्षाचे उत्तरप्रदेशातील नेते रघुराज सिंह यांनी धक्कादायक वक्तव्ये करून निदर्शकांविषयी धमकीवजा भाषा वापरली आहे. घोष यांनी रविवारी बंगालमधील एका सभेत आक्रमक वक्तव्ये करून वाद ओढवून घेतला.
काविरोधी निदर्शनांवेळी पश्चिम बंगालमध्ये सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करण्यात आली. ते निदर्शक मतदार असल्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पोलिसांना कारवाईचे आदेश दिले नाहीत.
मात्र, उत्तरप्रदेश, आसाम आणि कर्नाटकमधील भाजपच्या सरकारांनी तोडफोड करणाऱ्यांना कुत्र्यांप्रमाणे गोळ्या घातल्या, असे घोष म्हणाले. त्यावरून तृणमूल कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांनी घोष तसेच भाजपवर टीकेची झोड उठवली. भाजपचे नेते असणारे केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांनीही घोष यांचे वक्तव्य बेजबाबदारपणाचे असल्याचे म्हटले.
भाजपचे आणखी एक नेते रघुराज सिंह यांनीही त्यांच्या वक्तव्यांतून खळबळ उडवून दिली. उत्तरप्रदेशच्या अलिगढमध्ये रविवारी का विषयी जनजागृती करण्यासाठी भाजपने एका सभेचे आयोजन केले होते.
त्या सभेत बोलताना उत्तरप्रदेशचे मंत्री असणाऱ्या सिंह यांनी बेधडक वक्तव्यांचा कहर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात घोषणा देणाऱ्यांना जिवंत गाडले जाईल, अशी धमकी त्यांनी दिली.