विविधा: रघुनाथ धोंडो कर्वे

माधव विद्वांस

संततीनियमनाचे भारतातील आद्यप्रवर्तक रघुनाथ धोंडो कर्वे यांची आज जयंती. त्यांचा जन्म 14 जानेवारी 1882 रोजी मुरुड येथे झाला.त्यांच्या आईचे ते 9 वर्षांचे असतानाच निधन झाले. शिक्षणमहर्षी भारतरत्न धोंडो केशव कर्वे हे त्यांचे वडील. त्यांनी पहिल्या पत्नीच्या निधनानंतर दुसरा विवाह केला, त्यांच्या दुसऱ्या पत्नीने रघुनाथरावांचे चांगले संगोपन केले. त्यांचे शिक्षण पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. वर्ष 1899 मध्ये ते मॅट्रिक झाले.

वर्ष 1904 मध्ये ते फर्गसन कॉलेजमधून बी.ए. झाले. वर्ष 1906 साली ते मुंबईला ट्रेनिंग कॉलेजात शिक्षण घेण्याकरिता दाखल झाले. तेथे त्यांना प्रो. नेल्सन फ्रेझर यांचा सहवास मिळाला. त्यांचा त्यांच्यावर वैचारिक प्रभाव पडला. फ्रेंच भाषा शिकण्याचे त्यांच्याकडून त्यांना प्रोत्साहन मिळाले. त्यानंतर त्यांनी गणिताचे प्राध्यापक म्हणून मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात नोकरी केली. वर्ष 1919 साली ते गणितातील पीएच.डी. पदवी घेण्याकरिता पॅरिसला गेले होते, परंतु ती न मिळवता एका पदविकेवर समाधान मानून त्यांना परत यावे लागले. त्यांच्या मातोश्रींचा बाळंतपणातच देहान्त झाल्यामुळे गरोदरपणासंदर्भात स्त्रियांना व्यवस्थित शिक्षण आणि माहिती व्हावी असा त्यांचा आग्रह होता. त्यांनी नोकरी करीत असताना कुटुंब नियोजन व गृहस्वाथ्य याबाबत प्रबोधन सुरू केले. या गोष्टी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना आवडल्या नाहीत, प्राचार्यांनी त्यांना पदाचा राजीनामा देण्यास सांगितले. त्यांनी तो दिला परंतु महिलांच्या प्रश्‍नांसाठी आपले आयुष्य समर्पित केले.

स्त्री मुक्‍ती, स्त्री शिक्षण, स्त्री-पुरुष संबंध याबाबतही त्यांचा दृष्टिकोन अतिशय विचार परिवर्तक होता. 100 वर्षांपूर्वीच्या काळात या विषयावर प्रकट बोलणे असभ्यपणाचे मानले जाई. वाढत्या लोकसंख्येच्या धोक्‍याची तसेच समाजाच्या महिलांच्या आरोग्यविषयक बेफिकिरीची जाणीव होऊन त्यावर संशोधन करून त्यांनी वर्ष 1921 मध्ये एक पुस्तक प्रकाशित केले. फ्रान्समध्ये गेले असताना त्यांनी या विषयावर बरेच वाचन, अभ्यास केला. तेथून येताना सोबत ट्रंका भरून संततिनियमनाची साधने व पुस्तके घेऊन आले. लंडनमध्ये वर्ष 1921 मध्ये पहिले कुटुंब नियोजन केंद्र सुरू झाले. त्याच वर्षी भारतातही रघुनाथरावांनी कुटुंब नियोजन केंद्र सुरू केले ही बाब उल्लेखनीय आहे. या विषयाच्या मार्गदर्शनासाठी मुंबईत त्यांनी सुरू केलेली “राइट एजन्सी’ हे भारतातील पहिले कुटुंब कल्याण केंद्र होय. आपल्या राहत्या घरीच कुटुंबनियोजन केंद्र स्थापन केले व संततीनियमनाची साधने बनवून देण्याचा आधुनिक उपक्रम त्यांनी सुरू केला. या कार्यात त्यांच्या पत्नी मालतीबाई यांनीही सहकार्य केले. स्वत:ला एकही मूल नसताना त्यांनी शस्त्रक्रिया करून घेतली. लैंगिक रोगांची लक्षणे, कारणे त्यावरील उपाय यांबाबत लोकांना माहिती दिली. 14 ऑक्‍टोबर 1953 रोजी मुंबई येथे त्यांचे निधन झाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)