घाऊक बाजारात भाज्यांच्या भावात 15 ते 20 टक्‍क्‍यांनी घट ; किरकोळ बाजारात मात्र भाव चढले

पुणे : लॉकडाऊनच्या आदल्या दिवशी मार्केट यार्डात नेहमीच्या तुलनेत भाज्यांची आवक जास्त झाली. त्यामुळे भाज्यांच्या भावात रविवारच्या (दि. 12) तुलनेत सुमारे 15 ते 20 टक्‍क्‍यांनी घट झाली. तर, किरकोळ बाजारात मात्र भाज्यांची चढ्या भावानेच विक्री करण्यात येत आहे.

मंगळवारपासून (14 जुलै) लॉकडाऊन लागू होत आहे. दहा दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये पहिले पाच दिवस किराणा माल दुकाने, भाजीपाला विक्रीची दुकाने बंद राहणार आहेत. या काळात कडक निर्बंध लागू करण्यात आले असून संचारबंदी, वाहतूक बंदीच्या आदेशाची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यानंतर निर्बंध काहीसे शिथिल करण्यात येणार असून सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत भाजीपाला, दूध, जीवनावश्‍यक वस्तू, किराणा माल विक्रीची दुकाने खुली ठेवण्यात येणार आहेत.

लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची भीती वाटल्याने नागरिकांनी सोमवारी (13 जुलै) भाजीपाला खरेदीसाठी गर्दी केली. याविषयी भाजीपाला विभागप्रमुख दत्तात्रय कळमकर म्हणाले, बाजारात सोमवारच्या तुलनेत आज जास्त गर्दी होती. मात्र, कालच्या (रविवार) तुलनेत गर्दी कमी होती. दरम्यान भाज्यांच्या भावात रविवारच्या तुलनेत 15 ते 20 टक्‍क्‍यांनी घट झाल्याची माहिती व्यापारी अमोल घुले यांनी दिली.

दरम्यान शहरातील महात्मा फुले मंडई, इतर किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांच्या दुकानांच्या परिसरात खरेदीसाठी झुंबड उडाली होती. नागरिकांनी मास्कचा वापर केला असला तरी गर्दी वाढल्याने सामाजिक अंतर पाळण्याच्या नियमाला हरताळ फासण्यात आल्याचे अनेक ठिकाणी आढळून आले.

शहराच्या मध्यभागात, पूर्वभागात रात्रीपासून बांबूचे अडथळे उभे करण्यात आल्याने खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय झाली. मागणीच्या तुलनेत घाऊक बाजारातून होणारी आवक अपुरी पडू लागल्याने भाजीपाल्याच्या भावात किरकोळ बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढ झाली. 100 ते 200 रुपये किलो भावाने भाज्यांची विक्री होत आहे. किरकोळ विक्रेत्यांनी जादा भावाने घाऊक बाजारातून भाजीपाला खरेदी केल्याचे मार्केट यार्डातील किरकोळ विक्रेते संघटनेचे कार्याध्यक्ष प्रकाश ढमढेरे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.