पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 177 वा पदवीप्रदान समारंभ पुढच्या महिन्यात घेण्याचे नियोजन आहे. त्यासाठी पदवी आणि पदविका प्रमाणपत्र प्राप्त करू इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे.

पदवी प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी नियमित शुल्कासह 13 ते 20 जुलै यादरम्यान अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच विलंब शुल्कासह दि. 21 ते 25 जुलै यादरम्यान अर्ज करता येईल. पदवी अथवा पदविका प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज योग्य शुल्कासह भरल्यानंतर अंतिम वर्षाच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत अपलोड करणे आवश्‍यक आहे.

पदवीप्रदान समारंभ ऑनलाइन पद्धतीने योग्य ती काळजी व सामाजिक अंतर राखून आयोजित करण्यात येईल. त्यामुळे प्रमाणपत्रांसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र त्यांनी अर्जामध्ये नमूद केलेल्या पत्त्यांवर स्पीड पोस्टद्वारे पाठविण्यात येतील, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळ विभागाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी दिली.


अर्जासाठी सविस्तर माहितीसाठी संकेतस्थळ : convocation.unipune.ac.in

Leave A Reply

Your email address will not be published.