पुणे – राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत असताना विधानसभा 2024 निवडणुकीत अजित पवार गट आणि शिंदे-भाजप युतीमध्ये समान जागावाटप असेल. अजित पवार आणि शिंदे गट प्रत्येकी 90 जागा लढविणार असून उर्वरित जागा भाजप लढविणार आहे. परंतु, ज्या पक्षाचे जास्त आमदार निवडून येतील त्यांचाच मुख्यमंत्री असेल, असा फॉर्म्युला’ ठरला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्यासाठी अजित पवार गटाचे सर्वाधिक आमदार निवडून यावे लागतील.
राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांचे गट एकत्र येत सरकार’ झाल्यानंतर आता, मंत्रीमंडळ विस्ताराची तयारी सुरू आहे. तर, आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत भाजप-शिंदे गट आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचे सांगितले जात आहे. यातून भाजपसह शिंदे गट आणि राष्ट्रवादी गट यांच्यात जागा वाटपाचा फॉर्म्युलाही ठरला आहे. अजित पवार यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अजित पवार गट लोकसभेच्या 13 तर विधानसभेच्या 90 जागा लढवणार असल्याचे सांगितले जात आहे.
अजित पवार गटाकडे 55 विधानसभा मतदारसंघ कायम राहणार आहेत तर उर्वरित 35 विधानसभा मतदारसंघात त्यांचे बहुतांश उमेदवार कॉंग्रेसच्या उमेदवारांसमोर असतील. विदर्भ आणि शहरी भागात भाजपला झुकते माप असेल. तर, ग्रामीण भागात अजित पवार गटाला मतदारसंघ वाटपात प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) या “एमआयएम’कडील एकमेव लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या पक्षाला उमेदवारी मिळेल, असेही सांगितले जात आहे.
मुख्यमंत्री पदावरून शिंदे यांना हटविणार नाही…
अजित पवार यांनी पुन्हा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर त्यांच्या गटातील आमदारांना मंत्री पद दिली गेली. मंत्रीमंडळाचा विस्तार करून अनेकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होत असताना मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे यांना हटविण्यात येणार नसल्याचे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, दवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याबाबतचे आदेश दिल्लीवरून आले होते.
आता, अजित पवार हे काही आमदारांसह सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांना उपमुख्यंत्री पद देण्यात आले. राज्यात दोन उपमुख्यमंत्री पदाची ही पहिलीच वेळ आहे. त्यांना मुख्यमंत्री पद द्यायचे असते तर ते सत्तेत सहभागी होण्यापूर्वीच ठरले असते. परंतु, शिंदे यांना बाजुला करून अजित पवार यांना मुख्यमंत्री पद मिळणार नाही, हे स्पष्ट आहे. अजित पवार यांना मुख्यमंत्री पदी विराजमान होण्यासाठी त्यांच्या गटाचे सर्वाधिक आमदार 2024च्या निवडणुकीत निवडून येणे गरजेचे ठरणार आहे.
गटबाजीतून मतांचे विभाजन…
शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फुट पडून शिंदे गट, अजित पवार गट तयार झाल्याने या पक्षांच्या पूर्वीच्या परंपरागत मतदारसंघात या गटाचे उमेदवार निवडणुकीत एकमेकांसमोर थांबणार आहेत. यातून मतांचे विभाजन होऊन इतर पक्षाचा उमेदवार अथवा अपक्ष उमेदवार विजयी मतांची आघाडी घेऊ शकतो. त्यामुळे गटबाजी झालेल्या पक्षांना ही गटबाजी धोक्याची ठरणार आहे.