पुणे – “कोणाला ठार मारायचे किंवा धमकी देणे अशा पद्धतीचे काम पवार कुटुंबीय करत नाहीत; पवार साहेब तर अजिबातच असे काम करत नाहीत,’ असे वक्तव्य आमदार छगन भुजबळ मंगळवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केले. भुजबळ यांना जिवे मारण्याची सोमवारी धमकी आली होती. त्यांच्या स्वीय सहायकाच्या मोबाइलवर कॉल करून ही धमकी देण्यात आली होती. “अतिउत्साही लोक असतात; त्यामुळे अशा धमक्या येतात. पोलीस काळजी घेत आहेत, त्या आरोपीला अटकही करण्यात आली आहे. अशी धमकी देण्यामागे काय कारण आहे याचा तपास केला जाईल,’ असे भुजबळ म्हणाले.
शपथविधी झाला आता मंत्रिमंडळ विस्तार कधी, या विषयी विचारले असता “त्याबाबत मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना माहिती आहे. अद्याप कोणालाच खातेवाटप झाले नाही, ते लवकरच होईल. विरोधी पक्षनेता अधिवेशनात नेमला जातो, बाहेर नाही. विधानसभा अध्यक्ष त्या संदर्भात निर्णय घेतात,’ असे भुजबळ यांनी नमूद केले.
भुजबळांनंतर मुंडेंनाही धमकीचा फोन
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून बाहेर पडत अजित पवार यांच्या नेतृत्वात सरकारमध्ये स्थापन झालेल्या दोन मंत्र्यांना धमकीचे फोन आले आहेत. याआधी मंत्री छगन भुजबळ यांना धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली होती. त्या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक देखील केली आहे. मात्र त्यातच आता मंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातील परळी या गावाच्या निवासस्थानी धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. इतकच नाही तर धनंजय मुंडे यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीने 50 लाख रुपयांची मागणी देखील केली आहे. राज्यात सत्ता संघर्षादरम्यान अनेक राजकीय घडामोडी घडल्या होत्या.
त्यानंतर शरद पवार आणि खासदार संजय राऊत यांना धमकी आली होती. मात्र, आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकारमध्येच सामील झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनाही धमकीचे फोन आले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे.