शेरखान शेख
शिक्रापूर -शिक्रापूर-सणसवाडी जिल्हा परिषद गटात राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत अनेकांनी पक्ष बदल केले आहेत. काहींनी थेट आमदार अशोक पवार यांच्याकडे आपल्या गावाला जिल्हा परिषदेची संधी दिल्यास संपूर्ण गाव एक दिलाने काम करेल, अशी ग्वाही दिली असल्याने जिल्हा परिषदेचा दावेदार कोण ठरणार, अशी चर्चा जिल्हा परिषद गटात रंगली आहे.
शिक्रापूर येथील जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी आतापर्यंत तीनवेळा जिल्हा परिषद खेचून आणली आहे. सध्याच्या चालू जिल्हा परिषदच्या निवडणुकी दरम्यान दिवंगत नेते बाळासाहेब खैरे यांच्या पत्नी कुसुम खैरे यांना बिनविरोध निवडून देण्यासाठी बांदल यांनी आपला गट बदलला होता.
यावेळी शिक्रापूर सणसवाडी जिल्हा परिषद गटातून आमदार अशोक पवार यांचे खंदे समर्थक आबाराजे मांढरे यांच्या पत्नी कुसुम मांढरे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी तर त्यांच्या विरोधात दिवंगत नेते बाळासाहेब खैरे यांच्या पत्नी कुसुम खैरे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली.
यावेळी कुसुम मांढरे यांनी जिल्हा परिषदेच्या मानकरी ठरल्या, सध्या आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या असुन अनेकांनी तयारीला सुरूवात केली आहे, मात्र मंगलदास बांदल सध्या काही गुन्हे दाखल झाल्याने न्यायालयीन कोठडीत आहेत.
परंतु जिल्हा परिषद गटात मोठ्या प्रमाणात शांतता असताना सध्या भारतीय जनता पार्टीकडून दिवंगत नेते बाळासाहेब खैरे यांच्या पत्नी कुसुम खैरे रिंगणात असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून विद्यमान जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे यादेखील तयारीत आहेत. तसेच सध्या पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित दरेकर तसेच
पंचायत समितीच्या सभापती मोनिका हरगुडे, माजी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी सासवडे, बाजार समितीचे संचालक आबाराजे मांढरे, युवा कार्यकर्ते रोहित खैरे यांचे देखील नाव आघाडीवर आहे,
तर सध्या शिरूर तालुक्यात आमदार अशोक पवार यांच्यावर शिवसेना मेळाव्यात टीका केल्याने शिवसेना पक्षात दुफळी निर्माण झाली आहे,
या आठवड्यात सणसवाडी येथे झालेल्या एका कार्यक्रमात सणसवाडी ग्रामस्थांनी आमदार अशोक पवार यांचे अनोखे स्वागत करीत त्यांच्याकडे जिल्हा परिषदेची संधी आमच्या गावाला दिल्यास आम्ही एकजुटीने काम करून विजय खेचून आणू अशी ग्वाही दिली.
सध्या जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे यांचे पती आबाराजे मांढरे यांना जिल्हा शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीदरम्यान डावलले गेल्याने मांढरे काही प्रमाणात नाराज असल्याचे दिसून येत आहे. त्यातच अचानक सणसवाडी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या उमेदवारीची मागणी केल्याने जिल्हा परिषदेचा मानकरी कोण ठरणार अशी चर्चा शिक्रापूर-सणसवाडी गटात रंगली आहे.