महापालिकेच्या औषध खरेदी विलंबाला जबाबदार कोण?

नगरसेवकांचा सवाल : 45 लाखांच्या वाढीव खर्चाला मंजुरी
पिंपरी –
पालिकेच्या वायसीएम रुग्णालयासह दवाखाने, रूग्णालयांसाठी आवश्‍यक असणारी औषधे, साहित्य पुरवठा खरेदीसाठी असलेली 50 लाखांची तरतूद अवघ्या दीड वर्षातच संपली आहे. त्यामुळे पुढील सहा महिन्यांसाठी औषध खरेदीकरिता 45 लाखांचा वाढीव खर्च केला जाणार आहे. स्थायी समितीने त्यास मान्यता दिली. मात्र, महापालिकेची औषध खरेदी वर्ष-वर्षभर विलंबाने होते. त्याचा रुग्णसेवेवर परिणाम होतो, याला जबाबदार कोण?असा सवाल राष्ट्रवादीच्या सदस्यांनी उपस्थित केला. त्यावर प्रशासनाला समाधानकारक खुलासा करता आला नाही.
स्थायी समितीच्या बुधवारी (दि.17) पार पडलेल्या साप्ताहिक सभेत 33 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रूग्णालयासह सर्व दवाखाने, रूग्णालयांसाठी आवश्‍यक असणारी औषधे, साहित्य पुरवठा मध्यवर्ती औषध भांडार विभागामार्फत करण्यात येतो. यासाठी रूग्णालयाची औषधे किंवा साहित्याची वार्षिक मागणी मध्यवर्ती औषध भांडाराकडे आगाऊ नोंदविण्यात येते. वायसीएम रूग्णालयातील औषध भांडारात शिल्लक नसणारी तसेच मध्यवर्ती औषध भांडाराकडील निविदेत समाविष्ट नसणारी औषधे रूग्णालय पातळीवर दक्षता म्हणून खरेदी करण्यात येतात.

वायसीएम रूग्णालयाच्या अर्थसंकल्पामध्ये तातडीक औषधे खरेदी या लेखाशीर्षाखाली 50 लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार, 9 ऑगस्ट 2017 ते 8 ऑगस्ट 2019 या दोन वर्षे कालावधीसाठी पिंपरीतील कोठारी मेडीकल एजन्सी निश्‍चित करण्यात आली आहे. कोठारी मेडीकलने पुरवठा केलेल्या तातडीक औषधे, साहित्य खरेदीसाठी मार्च 2019 अखेर 50 लाख रूपये खर्च झाला आहे. या निविदेची मुदत 8 ऑगस्ट 2019 पर्यंत आहे. 45 लाख रूपये इतका वाढीव खर्च तातडीक औषध खरेदीसाठी अपेक्षित आहे.

या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली. याबाबत राष्ट्रवादीचे नगरसेवक पंकज भालेकर यांनी औषध खरेदी प्रस्तावाला आक्षेप घेतला. वायसीएममध्ये दर्जेदार वैद्यकीय सुविधा घेण्यासाठी गरीब व गरजू रुग्ण याठिकाणी उपचारासाठी येत असतात. मात्र, औषध खरेदीच वेळेवर होत नसल्याने, रुग्णांना पदरमोड करुन, औषधे विकत घ्यावी लागतात. त्याचा फटका शहरातील रुग्णांनादेखील बसत आहे. वर्ष-वर्षभर औषधांची खरेदी होत नसल्याने महापालिका प्रशासनाची असंवेदनशीलता दिसून येते. त्यामुळे या विलंबाला जबाबदार कोण? असा सवाल भालेकर यांनी उपस्थित केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)