नांदेड सिटीतील पंचम सोसायटीसमोरील घटना
पुणे – भरधाव येणाऱ्या टॅंकरला नांदेड सिटीतील सुरक्षा अधिकाऱ्याने गाठत चालकास टॅंकर हळू चालवण्यास सांगितले. मात्र, चालकाने त्याकडे दुर्लक्ष करत टॅंकर पळवला. यामध्ये संबंधित सुरक्षा अधिकाऱ्याचा टॅंकरच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना नांदेड सिटीतील पंचम सोसायटीसमोर डीसी मॉलकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली.
राजेंद्र दत्तात्रय वाबळे (45,रा.शिवणे) असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी टॅंकरचालकाविरुद्ध हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचम सोसायटीसमोर मंगळवारी दुपारी पाण्याचा टॅंकर भरधाव चालला होता. यावेळी सुरक्षा अधिकारी वाबळे यांनी बुलेटवरुन येऊन टॅंकर चालकास टॅंकर हळू चालवण्यास सांगितले. मात्र, त्यांनी वाबळे यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत टॅंकर तसाच वळविला. यामध्ये टॅंकरची बुलेटला धडक बसून झालेल्या अपघातात वाबळे यांना मृत्यू झाला. वाबळे यांच्या पाय आणि डोक्यास गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर चालक टॅंकरसह पळून गेला. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक शेळके करत आहेत.