चंदीगढ – आम आदमी पक्षाने सोमवारी राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या सर्व उमेदवारांची नावे जाहीर केली. आम आदमी पक्षाने राष्ट्रीय प्रवक्ते राघव चढ्ढा आणि क्रिकेटपटू हरभजन सिंग यांना उमेदवारी दिली आहे. ‘आप’ने उद्योगपती अशोक मित्तल यांनाही उमेदवारी दिली आहे. अशोक मित्तल हे पंजाबमधील अतिशय प्रसिद्ध नाव आहे.
अशोक मित्तल हे पंजाबमधील लोकप्रिय लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक आणि कुलगुरू आहेत. हे देशातील सर्वात मोठ्या विद्यापीठांपैकी एक असून ते 600 एकरमध्ये पसरलेले आहे. जगातील 50 देशांतील मुले या विद्यापीठात शिकतात. यावरून अशोक मित्तल हे शिक्षण क्षेत्रातील किती मोठे आणि प्रसिद्ध नाव आहे, याचा अंदाज येतो.
ऑटो डीलरशिप ते संसदेपर्यंतचा प्रवास –
1961 मध्ये अशोक मित्तल यांचे वडील बलदेव राज मित्तल यांनी मिठाईचे दुकान उघडले आणि या दुकानाचे नाव देखील लव्हली स्वीट हाऊस होते. अशोक यांच्या वडिलांनी 500 रुपयांचे कर्ज घेऊन मिठाईचे दुकान उघडल्याचे सांगितले जाते. अशोक मित्तल यांना दोन भाऊ असून नंतर दोन्ही भाऊही मिठाई व्यवसायात उतरले. हळूहळू मिठाईचे दुकान खूप प्रसिद्ध झाले. शिक्षणादरम्यान अशोक यांनीही वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करण्यास सुरुवात केली.
1991 मध्ये अशोक मित्तल यांनी मिठाई व्यवसायाव्यतिरिक्त ऑटोमोबाईल क्षेत्रात पाऊल ठेवले आणि बजाज कंपनीची डीलरशिप घेतली. व्यवसायात भरभराट झाली. एक पाऊल पुढे जात त्यांनी 1996 मध्ये मारुती सुझुकीची डीलरशिप घेतली. हळूहळू त्यांना व्यवसायात यश मिळत गेले. त्यानंतर 2001 मध्ये त्यांनी शिक्षण क्षेत्रात पाऊल ठेवले. 2001 मध्ये मित्तल यांनी पंजाबमधील फगवाडा येथे महाविद्यालयाची स्थापना केली. महाविद्यालयाचे नाव लव्हली प्रोफेशनल कॉलेज असे ठेवले.
2005 मध्ये अशोक मित्तल यांच्या लव्हली कॉलेजला विद्यापीठाचा दर्जा मिळाला आणि त्याचे नाव लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी झाले. हे विद्यापीठ 600 एकरमध्ये पसरलेले असून जगातील 50 हून अधिक देशांतील मुले येथे शिक्षण घेत आहेत. लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीची वार्षिक उलाढाल सुमारे 850 कोटी रुपये आहे. आता अशोक मित्तल यांच्या आयुष्यात आणखी एका अध्यायाची भर पडणार आहे कारण त्यांचे खासदार होणे जवळपास निश्चित झाले आहे.